हक्‍काच्या पाण्यासाठी ‘एल्गार’

सकाळ वृत्‍तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

महिलांचा सिडको अधिकाऱ्यांना घेराव; दहा दिवसांत पाणीपुरवठा न केल्यास आंदोलनाचा इशारा

मुंबई : सततच्या कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने व आश्वासनाने होरपळून निघालेल्या पनवेलकरांनी हक्काचे पाणी मिळावे यासाठी एल्गार पुकारला आहे. खारघरला पाणीपुरवठा करणारे हेटवणे धरण ओसंडून वाहत आहे; मात्र खारघरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना टॅंकरने पाणी घेत गरजा पूर्ण कराव्या लागत आहेत. त्याच अनुषंगाने पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी खारघरकरांनी सह्यांची मोहीम सुरू केली. तर नवीन पनवेलमधील नागरिकांनी आक्रमक होत सिडकोच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या मांडला. पाण्यासाठीच्या मोहिमेत नवीन पनवेलसह खारघरमधील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.  

ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईमुळे नवीन पनवेलमधील रहिवाशांनी सोमवारी सिडको ऑफिसवर मोर्चा काढला. पनवेल परिसरामध्ये गेले आठ दिवस धुवाधार पाऊस पडत आहे. परिसरातील नदी, नाले, धरणे ओसंडून वाहत आहेत. शनिवारी अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले होते. सगळीकडे जनजीवन विस्कळित झाले होते. अशी परिस्थिती असताना नवीन पनवेलकर मात्र तहानलेलेच आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. नवीन पनवेलमधील सेक्‍टर- १३, १४, १७, १८ या भागात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील नागरिक सिडको ऑफिसवर धडकले. या वेळी महिलांचा सहभाग लक्षणीय होता.  

सोसायट्यांमध्ये पाणीसाठवण टाक्‍या नसल्यामुळे येथील नागरिकांना नळाला येणाऱ्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. या वेळी संतप्त नागरिकांनी सहायक अभियंता राहुल सरोदे यांना घेराव घातला. अधीक्षक अभियंता प्रशांत काळे यांनी येत्या दहा दिवसांत ए टाईपपासून १५० मीटर नवीन पाईपलाईन टाकून येथील पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्‍वासन नागरिकांना दिले. दहा दिवसांत जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही; तर अंदोलन केले जाईल, असा इशारा संदीप पाटील यांनी सिडकोला दिला आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elgar for water claim