
लोकल, मेमू, डेमू यामध्ये एकत्रित सीसी टीव्ही बसवण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याचबरोबर स्थानकांवर पुरेशा संख्येने पादचारी पूलही उभारलेले नाहीत.
मुंबई : एल्फिन्स्टन रोड (प्रभादेवी) स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सर्व लोकल डब्यांमध्ये सीसी टीव्ही बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. चेंगराचेंगरीच्या त्या घटनेला 29 सप्टेंबरला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. परंतु अजूनही लोकल, मेमू, डेमू यामध्ये एकत्रित सीसी टीव्ही बसवण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याचबरोबर स्थानकांवर पुरेशा संख्येने पादचारी पूलही उभारलेले नाहीत.
29 सप्टेंबर 2017 रोजी एल्फिन्स्टन स्थानकातील पुलावर चेंगराचेंगरी होऊन 23 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 36 प्रवासी जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरील सोई-सुविधांचा आढावा घेतला होता. या आढाव्यात नवीन पादचारी पूल, सरकते जिने या सोई-सुविधांसह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व लोकलच्या डब्यांत सीसी टीव्ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सीसी टीव्ही बसवतानाच त्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत गार्ड आणि मोटरमनशी संवाद साधण्यासाठी टॉक बॅक; तर गार्डला सतर्क करण्यासाठी "पॅनिक बटन'चाही प्रस्ताव पश्चिम, मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला.
प्रस्तावानुसार मध्य रेल्वेवरील 142 आणि पश्चिम रेल्वेवरील 100 लोकल गाड्यांत ही यंत्रणा बसवली जाईल. मध्य रेल्वेला त्यासाठी 177 कोटी; तर पश्चिम रेल्वेला 123 कोटींचा खर्च येणार आहे. हे दोन्ही प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. त्याला अर्थसंकल्पातून मंजुरी मिळाली आहे. मात्र, अजूनही लोकल, मेमू, डेमू यामध्ये एकत्रित सीसी टीव्ही बसवण्याची निविदा प्रक्रिया सुरूच आहे.
पादचारी पूलही रखडले
एल्फिन्स्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर जुलै 2018 मध्ये अंधेरी स्थानकावर गोखले उड्डाणपुलावरची पादचारी मार्गिका कोसळली. त्यानंतर मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही मार्गांवर मिळून 102 नवीन पादचारी पूल बनवण्याचा निर्णय रेल्वेने 2018 मध्येच घेतला. तसेच पश्चिम रेल्वेने 115 पादचारी पूल आणि 29 उड्डाणपुलांची पाहणी केली. याशिवाय गेल्या वर्षी नव्या 33 पुलांना मंजुरीही देण्यात आली. तसेच 2018 मध्ये मध्य रेल्वेने वर्षभरात 20 पादचारी पूल नव्याने उभारले; तर 2019 मध्ये मध्य रेल्वेने 44 पादचारी पूल उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच दोन वर्षांत पश्चिम रेल्वेने नवीन 74 पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 2018 ला पश्चिम रेल्वेने 13 पादचारी पूल बांधले; तर आणखीन 34 पुलांचे काम अद्याप सुरू आहे.