'आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात, पण मानसिकता कायम'; देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

तुषार सोनवणे
Wednesday, 4 November 2020

अर्णब यांच्या अटकेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

मुंबई -  रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले. गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, अर्णब यांच्या अटकेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

राज्य सरकारकडून माध्यमांची गळचेपी, चंद्रकांत पाटलांचा आरोप 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरण, पालघर येथील साधू हत्या, कंगना रानौत आणि राज्य सरकारमधील वाद आदी मुद्यांवर राज्य सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलिसांनी अटक केली. वास्तूविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचे नाव असल्याचा दावा त्यांच्या कुटूंबियांनी केला होता. दरम्यान, भाजपनेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अर्णब यांना झालेल्या अटकेची तुलना त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणिबाणीशी केली आहे.

अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णव गोस्वामी यांचं नाव होतं

देवेद्र फडणवीस  यांनी म्हटले की, 'आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे.' 

 

-----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emergency ended in 1977 but mentality remains Devendra Fadnavis attacks the government