तुर्भे जनता मार्केट परिसरात अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील उड्डाणपुलांखाली अतिक्रमण करण्यास सक्त मनाई केली आहे; मात्र तुर्भे जनता मार्केटसमोरील उड्डाणपुलाखाली सर्रासपणे वाहने पार्क करून अतिक्रमण केले जात असल्याचे समोर आले आहे.

मुंबई ः मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील उड्डाणपुलांखाली अतिक्रमण करण्यास सक्त मनाई केली आहे; मात्र तुर्भे जनता मार्केटसमोरील उड्डाणपुलाखाली सर्रासपणे वाहने पार्क करून अतिक्रमण केले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराकडे मनपाच्या अतिक्रमण विभागाने दुर्लक्ष केले असल्याने पालिका घेत असलेल्या भूमिकेबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरात विनापरवाना बांधकाम केले असता मनपा अधिकारी ते तोडण्यासाठी सरसावतात; मात्र तुर्भे जनता मार्केटसमोरील उड्डाणपुलाखाली सर्रासपणे वाहने पार्क करून अतिक्रमण केले जात आहे. या ठिकाणी अतिक्रमण करू नये म्हणून जनहित याचिका १००/२०१५ प्रमाणे उच्च न्यायालयाचा मनाई आदेश असल्याबाबतचा फलक नवी मुंबई महापालिकेकडून लावण्यात आला आहे. तसेच या पुलाखाली तारेचे कुंपणदेखील घालण्यात आले आहे; मात्र या ठिकाणी वाहने आत जाण्याकरिता कुंपणाला सोयीस्कर असे प्रवेशद्वार या वाहनचालकांनी बनवले आहे. 

त्यामुळे या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या मनाई आदेशाचा फलक असूनही या आदेशाला डालवून व्यावसायिक तसेच खासगी वाहन चालक आपली वाहने पार्क करीत आहेत. या प्रकाराकडे तुर्भे विभागाचे अतिक्रमण पथक डोळेझाक करत असल्याने नागरिकांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

तुर्भे जनता मार्केट उड्डाणपुलाखाली वाहन पार्किंग होत असेल, तर या ठिकाणी वाहने पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- समीर जाधव, तुर्भे विभाग अधिकारी, नवी मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment in Turbhe Janata Market area