"कलम 370'चा अभियांत्रिकी प्रवेशाला फटका ? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा "कलम 370' रद्द केल्यानंतर राज्य सरकारने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत जम्मू-काश्‍मीरच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या कोट्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्याचा फटका यंदाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई, ता. 21 : जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा "कलम 370' रद्द केल्यानंतर राज्य सरकारने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत जम्मू-काश्‍मीरच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या कोट्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्याचा फटका यंदाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सरकारने वेळीच याबाबत निर्णय न घेतल्यास प्रवेश खोळंबण्याची भीतीही अधिकारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे सीईटी सेलने उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पत्र लिहिले आहे. 

महत्वाची बातमी ः खुशखबर! आता पनवेलवरुन थेट गोरेगावपर्यंत लोकल सेवा

केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा असलेले "कलम 370' रद्द केल्यानंतर देशात त्याबाबत समर्थन आणि विरोधही होत आहे. मात्र, त्याचा फटका आता राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत जम्मू-काश्‍मीरच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सर्व संस्थांमध्ये प्रत्येक शाखेच्या एकूण जागांमध्ये एक जागा राखीव आहे. या कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी जम्मू-काश्‍मीरमधील हजारो विद्यार्थी अर्ज करतात; परंतु यंदा "कलम 370' रद्द झाल्याने हा कोटा रद्द करावा लागणार आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून त्यासंदर्भात मार्गदर्शन सीईटी सेलला मिळालेले नाही. त्यामुळे "नीट' आणि "एमएचटी-सीईटी' प्रवेश परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. 

महत्वाची बातमी ः CAA वरून आंदोलकांना भडकावण्याचं काम कोण करतंय? उद्धव ठाकरे म्हणतात... 

प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपलब्ध असणाऱ्या जागांची माहिती उपलब्ध करून द्यावी लागते. त्यामुळे जम्मू-काश्‍मीरमधील विद्यार्थ्यांसाठी असलेला कोटा कायम ठेवायचा की इतर राज्यांच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 15 टक्के कोट्यातून प्रवेश द्यायचा, या द्विधा मनस्थितीत सीईटी सेलचे अधिकारी आहेत. याबाबतचा तिढा वेळीच न सुटल्यास प्रवेश प्रक्रिया खोळंबण्याची स्थिती ओढवण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

जम्मू-काश्‍मीरमधील विद्यार्थ्यांच्या कोट्याबाबत आम्ही उच्च-तंत्रशिक्षण विभागाला पत्र लिहिले आहे. विभागाकडून याबाबत माहिती मिळताच त्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. 
- संदीप कदम, आयुक्त, सीईटी सेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: engineering admission may be affected by artcle 370