खुशखबर! आता पनवेलवरुन थेट गोरेगावपर्यंत लोकल सेवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

एप्रिलपासून सुधारित वेळापत्रक लागू होणार 

मुंबई : पनवेलहून गोरेगावला जाणाऱ्या प्रवाशांसाठी लवकरच थेट लोकल सुरू होणार आहे. या मार्गाच्या तपासणीनंतर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर एप्रिल महिन्यात लागू होणाऱ्या सुधारित वेळापत्रकावर सध्या मध्य रेल्वे काम करीत आहे. या सुधारित वेळापत्रकात गोरेगाव ते पनवेल लोकल चालविण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. 

हेही वाचा - अबब! रुग्णवाहिकेत जन्मली ७९० बालके

हार्बर मार्गावर सध्या सीएसएमटी ते पनवेल व सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगावपर्यंत लोकल धावतात. याआधी गोरेगावऐवजी सीएसएमटी ते अंधेरीपर्यंतच हार्बर मार्गाची सेवा होती. सीएसएमटीतून अनेक प्रवासी अंधेरीपर्यंत प्रवास करून त्यानंतर पश्‍चिम रेल्वेवरून गोरेगाव व त्यापुढे प्रवास करत होते. त्यानंतर मार्च 2019 पासून गोरेगावपर्यंत लोकल गाड्या धावू लागल्या. गोरेगाव ते पनवेल लोकलसेवा सुरू करण्याकरिता जोगेश्वरी, गोरेगाव स्थानकाजवळ लोकल उभी करण्यासाठी (सायडिंग) तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळेच गोरेगावपासून पनवेलसाठी लोकलसेवा सुरू होऊ शकत नव्हती; मात्र आता पश्‍चिम रेल्वेने त्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर मध्य रेल्वेकडून हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील सुधारित वेळापत्रकाचे काम हाती घेण्यात आले आहे. या वेळापत्रकात प्रवाशांच्या सोयीसाठी गोरेगाव ते पनवेल थेट लोकल चालविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. 

हेही बातमी - असा असेल उद्याचा मेगाब्लॅाक

गोरेगावपर्यंत 18 लोकल फेऱ्या! 
सध्या सीएसएमटी ते गोरेगावपर्यंत अप-डाऊन मार्गावर लोकलच्या 86 लोकल फेऱ्या होतात. तसेच अंधेरी ते पनवेल अप व डाऊन मार्गावर दिवसभरात 18 फेऱ्या केल्या जातात. सध्या अंधेरी ते पनवेलदरम्यान धावणाऱ्या 18 फेऱ्यांचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्याचा प्रयत्न वेळापत्रकात केला जात आहे. त्यामुळे गोरेगावपासून पनवेलसाठी लोकल धावणे शक्‍य होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

web title : Now on the Harbor line Panvel-Goregaon Local Service!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now on the Harbor line Panvel-Goregaon Local Service