जनजागृतीसाठी आले अन्‌ कार्यकर्ते झाले!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

पालघरमधील आदिवासी महासंमेलनात तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा

मनोर ः पालघरमधील २७ व्या आदिवासी सांस्कृतिक महासंमेलनात भाग घेण्यासाठी देशभरातील आदिवासी पालघरच्या कोळगाव येथील मैदानात एकत्र आले. महासंमेलनात उच्चशिक्षित आदिवासी तरुण पारंपरिक पेहरावात उत्साहाने सहभागी झाले. आदिवासींमध्ये जागृती करण्यासाठी आलेले तरुण संमेलनाचाच एक भाग होऊन गेले अन्‌ कार्यकर्ते बनून त्यांनी याचा आनंद लुटला.

आयआयटीमध्ये रंगणार कॉन्सर्ट फॉर कॉज

महाराष्ट्राच्या शिरपूर तालुक्‍यातून आलेला यशवंत पावरा नामक उच्चशिक्षित तरुण आदिवासी एकता परिषदेसाठी काम करतो. काही वर्षांपासून आदिवासी संमेलनात भाग घेत असल्याचे त्याने सांगितले. आदिवासींचे शिक्षण, आरोग्य, धार्मिक आक्रमण आदी समस्यांवर त्याने परखड मते मांडली. निसर्गपूजक आदिवासींची संस्कृती जपून येणाऱ्या पिढीला जागृत करण्यासाठी दरवर्षी होणाऱ्या संमेलनात भाग घेतला पाहिजे. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्यावर धार्मिक आक्रमण होत आहे. वेळ पडल्यास संघर्ष करण्याची भूमिका त्याने व्यक्त केली. 

मोठी बातमी, मंगेशकर कुटुंबाची फडणवीसांवर नाराजी, पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले..

मध्य प्रदेश राज्यातील रतलाम जिल्ह्यातील भिल्ल जातीचे आदिवासी कुटुंब आदिवासी संमेलनात देशभरातून आलेल्या समाजाबाबत जाणून घेण्यासाठी आले होते. नाशिक जिल्ह्यातील प्रभाकर फसाळे याने आदिवासी क्रांतिकारकांचे पुतळे आणि कारला चिकटवण्याचे स्टिकर यांचा स्टॉल, शाडूची माती आणि नैसर्गिक रंग वापरून तयार केलेल्या आदिवासी क्रांतिकारकांचे पुतळे संमेलनाच्या निमित्ताने त्याने २५ टक्के सवलतींच्या दराने विकले. बिरसा मुंडा, राघोजी भांगरे आणि तंट्या मामा भिल्ल यांच्या पुतळ्यांना जास्त मागणी असल्याचे त्याने सांगितले. 

चित्रकला शिक्षक संदीप गांगुर्डे यांनी खिळ्याच्या वापराने तयार केलेली अप्रतिम चित्रे विक्रीला ठेवली होती. या माध्यमातून प्रबोधन करत असल्याचे त्यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यातील आणि सध्या कल्याणमध्ये वास्तव्यास असलेले दिनेश पावरा, गंगाराम पावरा आणि संजय वळवी हे तीन उच्चशिक्षित तरुण पारंपरिक पेहरावात संमेलनात सहभागी झाले होते. तीर-कामटा आणि आदिम पेहरावातील व्यवसायाने वकील असलेले अजितभाई वासावा समाजातील लोकांना निःशुल्क कायदेविषयक मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

उपस्थिती, एकता वाढल्याचे चित्र
मध्य प्रदेशातील अलिराजपूर जिल्ह्यातील कांतिभाई राठवा गेल्या २० वर्षांपासून आदिवासी संमेलनाला उपस्थित राहत आहेत. समाजात निर्माण झालेली जागरूकता, शिक्षण आणि आर्थिक स्थिती सुधारल्याने आदिवासी महासंमेलनात आदिवासींची उपस्थिती वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. पोंपी हाजोंग ही तरुणी आसाम राज्यातून संमेलनात सहभागी झाली होती. संमेलनात आदिवासींमधील एकता वाखाणण्याजोगी होती, असे तिने सांगितले.

प्रकल्प आदिवासींच्या मुळावर!
गुजरात राज्यातील सरदार सरोवरमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरातील नर्मदा जिल्ह्यातून काही तरूण आले होते. नर्मदा जिल्ह्यात रोजगार नाही. सरकारमार्फत वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी आदिवासींच्या जमिनी घेतल्या जात आहेत. त्यामुळे आदिवासी भरडला जात आहे, अशी खंत त्याने व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The enthusiasm of the youth is appreciated at the aadivasi pragram in Palghar