मुंबईत उलथापालथीचे लगाम भाजपच्या हाती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

मनसे नगरसेवकांच्या फोडाफोडीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. सोमय्यांच्या तक्रारीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.

मुंबई, ता. 14 : मनसेचे नगरसेवक फोडण्यासाठी शिवसेनेने घोडेबाजार भरवल्याचा आरोप करून भाजपने ताज्या उलथापालथीचे लगाम आपल्या हाती खेचून घेतल्याचे मानले जाते. शिवसेनेला खिंडीत गाठण्यासाठी भाजप मनसेच्या फुटीर नगरसेवकांमागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा लावण्याची शक्‍यता आहे. 

मनसे नगरसेवकांच्या फोडाफोडीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. सोमय्यांच्या तक्रारीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही; मात्र शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी फुटीर नगरसेवकांची नोंदणीच होऊ नये, यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात येते. त्याबरोबरच या नगरसेवकांमागे लाचलुचपत चौकशी लावण्याचीही भाजपची रणनीती असल्याचे समजते. 
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच मुंबईत आले आहेत. त्यांनीही राजकीय घडमोडींबद्दल मौन पाळले आहे; परंतु फुटीर नगरसेवकांच्या नोंदणीबाबतच्या कायदेशीर प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. 

मनसेची तक्रार 
शिवसेनेत आलेल्या मनसेच्या सहा फुटीर नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे शुक्रवारी अर्ज केला आहे. त्याची नोंदणी प्रलंबित आहे. मनसेने या नोंदणीवर आक्षेप घेणारे पत्र आयुक्तांना दिले आहे. त्याच्यावर सुनावणी झाल्यानंतरच फुटिरांची नोंदणी होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले. 

इशाऱ्याकडे राज यांचे दुर्लक्ष? 
मनसेचे बंडखोर गटनेते दिलीप लांडे यांनी महिनाभरापूर्वी दादर येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात नगरसेवकांची बैठक घेतली होती. त्या वेळी नगरसेवक नाराज आहेत. एकदा भेटून घ्या, असा निरोप अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवण्यात आला होता; मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर हे बंड झाले, अशी चर्चा आज सुरू होती. 

कॉंग्रेसचा भाव 
भाजप कॉंग्रेसचे 10 ते 11 नगरसेवक फोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. भांडुपची पोटनिवडणूक जिंकल्यावर किरीट सोमय्या यांनी लवकरच भाजपचा महापौर होईल, असे भाकीत केले होते. कॉंग्रेसचे नगरसेवक फोडण्याची रणनीती भाजपने आखल्यानेच सोमय्यांनी हे भाकीत केले, असे सांगण्यात येते. त्यामुळे कॉंग्रेसच्या नगरसेवकांचाही भाव वाढण्याची शक्‍यता आहे. 
 

Web Title: esakal bmc news bjp shivsena mns news