इंधन दरवाढीमुळे जनतेची ‘ऐशी’तैसी

दीपक शेलार
सोमवार, 22 जानेवारी 2018

 काँग्रेसच्या काळात चार ते सहा महिन्यातून किंवा वर्षांतून एकदा दरवाढ होत होती.तेव्हा भाजपकडून आंदोलन केले जात असे, परंतु सध्या दररोज दरबदलाच्या निमित्ताने इंधनदर वाढत असल्याने महागाईचा कहर सुरू आहे.त्यामुळे,सर्वसामान्यांचे बजेटदेखील कोलमडून पडले आहे.
-किशोरी राणे (गृहिणी)

ठाणे- ‘अच्छे दिन’चा वायदा करून सत्तेचा सोपान चढलेल्या मोदी सरकारने पारदर्शकतेच्या नावाखाली इंधन दरवाढ करून सर्वसामान्याच्या जगण्याची ‘ऐशी’तैसी करून ठेवली आहे.दर निर्धारणासाठी लागू केलेल्या नवीन पद्धतीच्या माध्यमातून इंधनाची छुपी दरवाढ सुरू आहे. दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दोन-तीन,पाच पैसे दरवाढ करून नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात तब्बल दोन ते चार रुपये इतकी वाढ झाली आहे.31 डिसेंबरला प्रतीलिटर 78 रुपये असलेल्या पेट्रोलच्या किमती 80 रुपयांवर पोहचल्या असून डिझेलही 63 रुपये 41 पैसेवरून 66 रुपये 97 पैसे प्रतीलिटर झाले आहे.त्यामुळे,छुप्या इंधन दरवाढीची चर्चा होत नसली तरी वाहनचालकांच्या खिशावर सरकार साळसूदपणे डल्ला मारत असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान,या इंधन दरवाढीचा फटका मालवाहतुकीलादेखील बसून महागाई वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होणाऱ्या चढ-उतारामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वारंवार बदलतात. मात्र, अनेकदा बॅरलच्या भावात वाढ झाली की त्याचा थेट फटका ग्राहकांना सहन करावा लागतो. असे होऊ नये म्हणून भारतातील प्रमुख तेल कंपन्यांनी आणि सरकारने इंधनाचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला केंद्र सरकारने हिरवा कंदील देत त्यावर अंमलबजावणी सुरू केली. या पद्धतीमुळे दर नियंत्रणात राहतील आणि ग्राहक व पेट्रोलपंप मालकांनाही दिलासा मिळेल,असा विश्वास कंपन्यांनी आणि सरकारने व्यक्त केला होता. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने दोन-दोन रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केला होता. मात्र,तेव्हापासून इंधनदर कमी झाले नसून पै-पै नी दरवाढ सुरूच आहे. मागील महिन्याचा विचार केला तर पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहे. 1 डिसेंबर 2017 ला पेट्रोलचे दर प्रतिलिटर 77 रुपये होते. त्यामध्ये दरदिवशी सातत्याने काही पैशांची वाढ सुरू असल्याने वर्षाच्या सरत्या दिनी (31 डिसेंबर) 78 रुपये असलेल्या पेट्रोलच्या किमती आता 80 रुपयांच्यावर गेल्या असून,डिझेलही तीन ते साडतीन रुपयांनी महागले आहे.

 

 

Web Title: esakal marathi news petrol diesel prices news