ठाण्यात अमली पदार्थाचे घबाड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

मुंब्रा परिसरात नशाबाजांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, अनेक तरुण याच्या आहारी गेले आहेत. ठाण्यात हेरॉइन, एमडी, चरस, गांजा आदींसारख्या अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते.

ठाणे : ठाण्यात अमली पदार्थांचे घबाड सापडले असून, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ठाणे आणि मुंब्रा परिसरातून दोघांना अटक केली आहे. ठाणे स्थानक परिसरात हेरॉइन विक्रीसाठी आलेल्या सोनू शग्गीर अहमद अन्सारी याला अटक करून त्याच्याकडून 39 लाख 25 हजारांचे हेरॉइन जप्त केले. न्यायालयाने अन्सारी याला सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. दुसऱ्या घटनेत पोलिस पथकाने मुंब्रा परिसरातून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरफच्या साठ्यासह इर्शाद मोहम्मद खानला अटक केली. 

मुंब्रा परिसरात नशाबाजांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, अनेक तरुण याच्या आहारी गेले आहेत. ठाण्यात हेरॉइन, एमडी, चरस, गांजा आदींसारख्या अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने ठाणे एसटी स्थानक परिसरात सापळा रचून अन्सारी याला मुंब्य्रातून अटक केली. त्याची झाडाझडती केली असता त्याच्याकडे 392 ग्रॅम हेरॉइन आढळले. या हेरॉइनची किंमत तब्बल 39 लाख 25 हजार इतकी आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अन्सारीने हे हेरॉइन मध्य प्रदेशातून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली; मात्र मध्य प्रदेशातून कोणाकडून आणले?, विकत घेणारा कोण होता?, याबाबत चौकशी सुरू आहे. 

दुसऱ्या घटनेत अमली पदार्थविरोधी पथकाने मुंब्रा परिसरातून अटक केलेल्या इर्शाद खान याच्याकडून नशेसाठी वापरले जाणारे कफ सिरफ असलेले फेन्सिरेक्‍स नामक औषधाच्या साडेआठ हजार बाटल्या हस्तगत केल्या. याप्रकरणी खान याच्याविरुद्ध मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणाचा अधिक तपास अमली पदार्थविरोधी पथक करत आहे. 

Web Title: esakal thane news drugs found in thane

टॅग्स