सीएसएमटी स्थानकाबाहेर आता ई-टॅक्‍सी सेवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

मध्य रेल्वेचा "मेरू कॅब' कंपनीशी करार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर प्रवाशांसाठी आता ई-टॅक्‍सी सेवा उपलब्ध होणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने "मेरू कॅब' या कंपनीशी करार केला आहे. यासाठी स्थानकाबाहेर लवकरच पीक अप पॉईंट उभारण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेतर्फे महत्वाच्या रेल्वेस्थानकाबाहेर प्रवाशांसाठी ई-टॅक्‍सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून होणार असून यासाठी मध्य रेल्वेतर्फे निविदासुद्धा काढण्यात आल्या होत्या. त्यानुसार मध्य रेल्वेने मेरू कॅब या कंपनीशी करार केला आहे. या कंपनीकडून मध्य रेल्वेला वर्षाला चार लाख 50 हजार रुपये इतका महसूल मिळणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना सीएसएमटी स्थानकाबाहेरून ई टॅक्‍सी मिळणे सोपे होणार आहे. प्रवाशांनी स्मार्टफोन किंवा ऍपवरून टॅक्‍सीचे बुकिंग केल्यानंतर टॅक्‍सी स्टॅंडजवळ त्यांना तत्काळ टॅक्‍सी मिळेल. सीएसएमटीचे हे मॉडेल आणखी काही महत्त्वपूर्ण रेल्वेस्थानकावर लवकरात लवकर राबविण्यात येणार आहे.

गर्दीच्या स्थानकावर पिक अप झोन
सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावर ही सुविधा येत्या काळात उपलब्ध होणार आहे. त्यानंतर दादर, ठाणे, एलटीटी आणि पनवेल या गर्दीच्या रेल्वेस्थानकांवर ई-टॅक्‍सीसाठी पिक अप झोन उभारण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकाच्या बाहेर या टॅक्‍सींसाठी खास पार्किंगची जागा निश्‍चित करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.

मध्य रेल्वेने सर्व बाबींचा विचार करूनच ई टॅक्‍सी कंपन्याना रेल्वेस्थानकाबाहेर जागा द्याव्यात. कारण सुरुवातीपासून काळी-पिवळी टॅक्‍सी चालकांच्या उदरनिर्वाहावर गदा येणार नाही, त्याच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी
- के. के. तिवारी, अध्यक्ष, स्वाभिमानी टॅक्‍सी-रिक्षा चालक-मालक संघटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ETAXI AT CSTM RAILWAY STATION MUMBAI