कोरोनाच्या सावटातही दिवाळीचा उत्साह कायम; लहान दागिनेखरेदीवर भर

कोरोनाच्या सावटातही दिवाळीचा उत्साह कायम; लहान दागिनेखरेदीवर भर

मुंबई  ः कोरोनाचे सावट असूनही मुंबईकरांनी नेहमीच्याच उत्साहात मित्र-नातलगांच्या भेटी घेत, गोडधोड फराळाचा आस्वाद घेत दणक्यात दिवाळीचा सण साजरा केला. दिवाळीच्या निमित्ताने सोन्याचांदीचे दागिने घेण्याचा उत्साहदेखील कायम होता. 

कोरोनाची टांगती तलवार अजूनही कायम असल्याने सणांचा राजा असलेला दिवाळीचा सण कसा साजरा करायचा याबाबत लोक आधी साशंक होते. मात्र राज्यातील व देशातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे पाहून लोकांनी दिवाळीपूर्वी जोरदार खरेदी केली. घरोघरी गोडधोड लाडू-करंज्या-शंकरपाळे तसेच चटपटीत चकली-चिवडा हा फराळही उत्साहाने झाला. बहुसंख्य स्त्रीपुरुष नोकरदार अजूनही घरीच असल्याने यावेळी फराळ करण्याचा उत्साह काही वेगळाच होता. 

दिवाळीच्या खरेदीसाठी प्रमुख बाजारपेठांमधील रस्ते तुडुंब भरले होते, तसेच रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आकर्षक दिव्यांच्या माळा, पणत्या, कंदील आदींच्या सजावटीमुळे इमारतीही अत्यंत आकर्षक दिसत होत्या. लोकांनी ऐन दिवाळीतही एकत्र येऊन लक्ष्मीपूजन धूमधडाक्यात साजरे केले. व्यापाऱ्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांसह कार्यालयांमध्ये चोपडीपूजन केले. अगदी फटाके उडविण्यासाठीही बालगोपाल मंडळी व त्यांचे पालक एकत्र आले होते. दिवाळी पहाट आदी सार्वजनिक कार्यक्रम नसले तरी नागरिकांनी नेहमीप्रमाणे आपले स्नेही, मित्र, नातलग यांच्याघरी जाऊन एकमेकांच्या भेटी घेण्याची व मिठाई-फराळ यांच्यासह शुभेच्छा देण्याची परंपरा कायम ठेवली. 

सार्वजनिक जागी फटाके वाजविण्यास परवानगी नसली तरीही अनेक ठिकाणी रस्त्यांवर, मैदानात फटाके उडविण्यात आले. अशावेळी तसेच एकमेकांच्या भेटीगाठींच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगही अपवादानेच पाळण्यात आले. अर्थात एकमेकांच्या भेटीगाठी घेताना लोकांनी मास्क-सॅनिटायझरचा वापर, हात धुणे आदी काळजी घेतली होती. तरीही काहीजण याकडे दुर्लक्ष करतानाही दिसत होते. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगली पाहिजे, असा इशाराही दिला जात आहे. 

सोनेखरेदीही जोरात
दिवाळीत मध्यमवर्गीयांनी उत्साहाने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिनेखरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी लोकांचा कल कमी वजनाचे, लहान आकाराचे दागिने खरेदी करण्याकडेच आहे. अर्थात धनत्रयोदशीला गर्दी झाली असली तरी मागीलवर्षीची गर्दी व यावर्षीची गर्दी याची तुलनाच होऊ शकत नाही. आता गर्दी कमीच आहे, असे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे संचालक आनंद पेडणेकर यांनी सकाळ ला सांगितले. मात्र लग्नसराईसाठी दागिनेखरेदी सुरु झाली असून त्यांचा उत्साह तसाच कायम आहे, असेही ते म्हणाले. 

यावेळी कोरोनामुळे लोकांसमोर आर्थिक अडचणी आल्या आहेत. तरीही ऋण काढून सण साजरा करण्याची आपली पद्धत आहे, धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याची आपली परंपरा आहे. त्यानुसार लोक खरेदीसाठी त्याच उत्साहाने आले होते. यावेळी लोकांनी कमी वजनाच्या, कमी किमतीच्या लहान दागिनेखरेदीस प्राधान्य दिले. साधारण सात ग्रॅम वजनाचे म्हणजे तीस ते पस्तीस हजार रुपये किमतीचे दागिने बऱ्याच जणांनी घेतले. काहींनी पंधरा ग्रामचेही दागिने घेतले, धनत्रयोदशीला प्रामुख्याने सामान्य मध्यमवर्गीय लोक येतात. उच्चभ्रू ग्राहक या गर्दीत आले नाहीत, त्यांनी नरकचतुर्दशीला व रविवारी दागिने खरेदी केले. काहींनी दिवाळीपूर्वीच येऊ बिस्किटे, नाणी आदी खरेदी केले, असेही पेडणेकर म्हणाले. 

लग्नसराईची खरेदी, ऑर्डर देणे हेदेखील आता सुरु झाले आहे. डिसेंबर जानेवारीपासून मुहूर्त सुरु होत आहेत. यावेळी मार्च ते मे या मुहूर्तातील लग्ने फारशी न झाल्याने ती आता या मोसमात होणार आहेत. त्यामुळे या खरेदीचे प्रमाण वाढले आहे, जरी सध्या सोन्याची किंमत मागीलवर्षीपेक्षा वाढली आहे, तरी लग्नात सोने देण्याघेण्याची पद्धत असल्याने ही खरेदी सुरुच असल्याचेही पेडणेकर यांनी दाखवून दिले.

Even in Corona, the Diwali festivities continue Emphasis on small jewelry purchases

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com