सावधान ! काँगो' ताप महाराष्ट्रात हातपाय पसरतोय; ही आहेत लक्षणं आणि अशी घ्या काळजी

सावधान ! काँगो' ताप महाराष्ट्रात हातपाय पसरतोय; ही आहेत लक्षणं आणि अशी घ्या काळजी

मुंबई  - महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यांमधून अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर येतेय. पालघर प्रशासनाने मंगळवारी महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात 'काँगो' नामक तापाच्या संभाव्य प्रसाराबाबत अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. क्रिमीयन कॉंगो हेमोरॅजिक फिव्हर (सीसीएचएफ) Crimean Congo Hemorrhagic Fever (CCHF) म्हणजेच काँगो असं या तापाचं नाव आहे. मुख्यत्वे हा ताप मुख्यत्वे 'टिक' म्हणजेच गोचीड नामक रक्तपिपासू किड्यापासून पसरतो.

कुणाला आहे सर्वाधिक धोका : 

जिल्ह्या प्रशासनाच्या माहितीप्रमाणे कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काँगो ताप हा आजार पशुपालक, मांसविक्रेते आणि पशुसंवर्धन यांच्यासाठी चिंता वाढवणारा आहे. पशुपालक कायम गुरांच्या सानिध्यात असतात. गुरांच्या अंगावरील गोचीडापासून हा रोग पसरत असल्याने सर्वाधिक धोका पशुपालकांना आहे. या तापवर कोणतेही औषध अद्याप उपलब्ध नसल्याने वेळीच खबरदारी घेणं गरजेचं आहे. 

कसं होतं संक्रमण ? 

शासनाच्या परिपत्रकात असं म्हंटल आहे की, हा विषाणूजन्य रोग एका विशिष्ट रक्तपिपासू 'टिक' म्हणजेच गोचीड नामक किड्यापासून एका प्राण्यातुन दुसऱ्या प्राण्यांमध्ये संक्रमित होतो. संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने किंवा संक्रमित प्राण्यांचे मांस खाल्ल्याने हा रोग मानवांमध्ये पसरतो.

काय आहेत लक्षणे 

डोकेदुखी, उच्च ताप, पाठदुखी, सांधेदुखी, पोटदुखी आणि उलट्या ही या रोगाची लक्षणे आहेत. त्यासोबतच डोळे लाल होणे, घसा लाल होणे आणि टाळूवरील लाल डाग ही कॉंगो व्हायरसची सामान्य लक्षणे आहेत.

कशी घ्याल काळजी ? 

या रोगाच्या प्रसाराची किंवा संक्रमणाची सर्वाधिक भीती पशुपालक किंवा मांस विक्रेते यांना आहे. त्यामुळे प्राण्यांमध्ये वावरताना विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. प्राण्यांमध्ये वावरताना मुख्यत्त्वे संपूर्ण हातांचे ग्लोव्ज घातले पाहिजेत. एखाद्या पशूच्या अंगावर गोचीड असेल तर संरक्षक कपडे घालणे आणि योग्य पद्धतीने लवकरात लवकर गोचीड काढले गेले पाहिजेत. एखाद्या प्राण्याला काही इजा झाली असेल आणि त्यातून रक्तस्त्राव होत असेल तर विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. प्राण्याचं रक्त्त मानवी संपर्कात तसेच इतर प्राण्याच्या संपर्कात येणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. मांस विक्रेत्यांनी कत्तलखान्यात येणाऱ्या पशु आणि प्राण्यांची तपासणी करून त्यांची विक्री केली पाहिजे. आजारी पशूंमध्ये हा व्हायरस आढळू शकतो .  

मृत्युदर किती ? 

प्राण्यांमधून मानवामध्ये संक्रमित होणाऱ्या या रोगाचं वेळेवर या आजाराचं निदान झालं नाही तर ३० टक्के रुग्ण दगावतात.

गुजरात आहे काँगोचे हॉटस्पॉट ?

पालघर जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत डी कांबळे यांनी एका परिपत्रकात म्हटले आहे की, सीसीएचएफ (काँगो)  गुजरातच्या काही जिल्ह्यात आढळून आला आहे. त्यामुळे येत्या काळात हा आजार गुजरातच्या सीमेलगत असलेल्या पालघरमध्ये पसरू शकतो. गुजरातच्या वलसाड जिल्ह्याला लागूनच महाराष्ट्राचा पालघर जिल्हा आहे. त्यामुळे या आजाराबाबतची सर्व आवश्यक काळजी त्याचसोबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. 

या रोगावर लस आहे का ?

चिंताजनक बाब म्हणजे या आजारावर ना प्राण्यांसाठी ना मानवासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही.

Crimean Congo Hemorrhagic Fever know everything about fast spreading Congo fever

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com