esakal | ठाणे वगळता जिल्ह्यातील इतर कोणत्याही पालिकेत पशूसंवर्धन विभागच नाही; 'बर्ड फ्लू' विषयी माहिती मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे वगळता जिल्ह्यातील इतर कोणत्याही पालिकेत पशूसंवर्धन विभागच नाही; 'बर्ड फ्लू' विषयी माहिती मिळेना

जिल्ह्यातील ठाणे महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये पशूसंवर्धन विभागच नसल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर येत आहे.

ठाणे वगळता जिल्ह्यातील इतर कोणत्याही पालिकेत पशूसंवर्धन विभागच नाही; 'बर्ड फ्लू' विषयी माहिती मिळेना

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली  : मुंबई-ठाणे शहरापाठोपाठ इतर शहरांतही आता मृत पक्षी आढळून येत असून राज्यात बर्ड फ्लूने हातपाय पसरण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ठाणे महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये पशूसंवर्धन विभागच नसल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर येत आहे. त्यामुळे शहरात बर्ड फ्लूची नेमकी स्थिती काय, याबाबत कोणाकडे चौकशी करावी, याचा संभ्रम नागरिकांना पडला आहे. स्थानिक प्रशासनाने ही जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली आहे; तर ही जबाबदारी स्थानिक प्रशासनाचीच असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे म्हण्णे आहे. 

राज्यात मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या विषाणूने शिरकाव केला आहे. ठाणे शहरापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ तालुक्‍यातही मृत पक्षी आढळून येत आहेत. सोमवारी ठाण्यातील पक्षी बर्ड फ्लूनेच मेल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने मंगळवारी अनेक चिकन, मटन शॉप ग्राहकांविना ओस पडले असल्याचे दिसून आले. अंबरनाथ, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर या महापालिका क्षेत्रात बर्ड फ्लूबाबत काय स्थिती आहे, याचा आढावा घेतला असता एकाही महापालिकेत पशूसंवर्धन विभाग, पशूवैद्यकीय अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनेक अधिकाऱ्यांना याविषयी विचारणा केली असता कोणालाही बर्ड फ्लू विषयी अद्याप प्रशासनाने काही निर्णय घेतला आहे का, याची माहिती नाही. तसेच, याविषयी कोणाकडे विचारणा करावी याचीही माहिती नसल्याचे यावेळी दिसून आले. भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ येथेही असा कोणताही विभाग नसल्याचे आढळून आले. स्थानिक पालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी शहरात किती चिकन मटन विक्रेते आहेत, याची नोंद ही अन्न व औषध प्रशासनाकडे असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटक ली आहे. 

शहरातील चिकन, मटन विक्रेत्यांची नोंदणी ही स्थानिक प्रशासन संस्थांकडे असणे बंधनकारक आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील पोल्ट्री फॉर्म, विक्रेते यांची तपासणी करण्यात येणार आहे. चिकन कोणाकडून आले, विक्रेते परवाना धारक आहेत का? पशू कापण्यापूर्वी डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र मिळवले होते का, यासर्वांची खात्री केली जाणार आहे. प्रत्येक पशूची वैद्यकीय तपासणी होणे आवश्‍यक आहे. 
- सुरेश देशमुख,
सहआयुक्त, अन्न व औषध विभाग ठाणे 

चिकन - मटन शॉप ओसाड 
ठाण्यात बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याचे समजताच ग्राहकांनी चिकन, मटण खाणे बंद केले आहे. सोमवारपासून दुकानांवर एकही ग्राहक फिरकलेला नाही. शनिवार-रविवारपासून ही स्थिती असून आता पुढे काय होणार हे माहित नाही, अशी प्रतिक्रिया ठाण्यातील विक्रेते शोएब कुरेशी यांनी दिली आहे. कोरोना काळात काही अफवांमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. आता बर्ड फ्लूमुळे पुन्हा व्यवसाय पूर्ण बसला आहे. आता आमच्यासमोर उदरनिर्वाहाचाच प्रश्‍न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. 

मुंबई, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

माल येणे बंद 
ठाण्यात चिकन, मटन विक्रेत्यांकडे शनिवार, रविवारी खरेदी केलेला माल अद्याप तसाच पडून आहे. ग्राहकांअभावी तो आता खराब होण्याच्या मार्गावर आहे. राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोल्ट्री फॉर्म व इतर ठिकाणाहून माल येणेही बंद झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. 

Except Thane, there is no Animal Husbandry Department in any other municipality in the district

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image