"आरे'तील आंदोलक विद्यार्थ्यांचा जल्लोष 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

गुन्हे मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार 

मुंबई : आरे वसाहतीमधील मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या 29 आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली होती. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यामुळे आंदोलकांनी आनंद व्यक्त करून या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मेट्रो कारशेडसाठी गोरेगाव येथील आरे वसाहतीत रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी 29 जणांना कलम क्र. 353 नुसार गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलेल्या पर्यावरणप्रेमींमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथम आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आणि त्यानंतर रविवारी 29 आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर सोमवारी सकाळी या आंदोलक विद्यार्थ्यांनी कारशेडच्या ठिकाणी एकत्र येऊन आनंद व्यक्त केला व मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानले.

आमची सत्ता आल्यावर आरे वसाहतीतील एकही झाड तोडू देणार नाही; या परिसराला जंगल घोषित करू, असे आश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्या आश्‍वासनाची पूर्तता त्यांनी केल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमच्यावर चुकीच्या पद्धतीने दाखल केलेले गुन्हे मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. नवीन सरकार आरे परिसराला जंगल घोषित करेल असा विश्‍वास आहे, अशी प्रतिक्रिया टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये (टीआयएसएस) कायद्याचा अभ्यास करणाऱ्या कपिल अग्रवाल याने दिली. नवीन सरकारने आरे परिसराला जंगल घोषित करावे. तेथील झाडे वाचवण्यासाठी आम्ही केलेल्या संघर्षाचा हा विजय आहे, अशी भावना मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी विजय कांबळे याने व्यक्त केली. 

सरकारने गुन्हे मागे घेतल्यामुळे आम्ही निश्‍चिंत झालो आहे. गुन्हेगार नसतानाही आम्हा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. 
- सुवर्णा सावे, विद्यार्थिनी, सिद्धार्थ महाविद्यालय 

एका चांगल्या हेतूने आम्ही एकत्र आलो होतो. आरे वसाहतीतील झाडे वाचवण्यासाठी एकत्र येऊन सामान्य नागरिकांनी आंदोलन केले. आता नवीन सरकारने मेट्रो कारशेडचे स्थलांतर करावे. 
- आकाश पाटणकर, पर्यावरणप्रेमी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The excitement of the protesting students of "Aare"