
"राज्य कोव्हिड टास्क फोर्स' चे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांना महामारीविषयी काय वाटते, भविष्यात काय खबरदारी घेतली पाहिजे, याविषयी "कॉफी विथ सकाळ' या उपक्रमांतर्गत त्यांची मुलाखत...
कोरोना काळात वेगवेगळ्या स्तरांवर आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस लढत होती. कोरोना भारतात दाखल झाल्यापासून ते लस उपलब्ध होईपर्यंतच्या या प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे अनुभव आरोग्य यंत्रेणेला आहेत. या महामारीच्या काळात महाराष्ट्र शासनाने "राज्य कोव्हिड टास्क फोर्स' स्थापन केला होता. त्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांना महामारीविषयी काय वाटते, भविष्यात काय खबरदारी घेतली पाहिजे, याविषयी "कॉफी विथ सकाळ' या उपक्रमांतर्गत त्यांची मुलाखत...
कोरोनाने आपल्या आरोग्य व्यवस्थेला कुठला धडा शिकवला असे तुम्हाला वाटते? आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची आवश्यकता आहे?
- नक्कीच. आरोग्य व्यवस्था सक्षम करायलाच हवी. त्यातही संसर्गजन्य रुग्णालये बळकट करणे महत्त्वाचे आहे. मुळात आपल्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी फारच कमी तरतूद केली जाते. 2025 पर्यंत "सर्वांसाठी आरोग्य' या योजनेनुसार एक लाख कोटी खर्च करायला हवेत, तरच आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम होईल. राज्यातील अनेक रुग्णालयांतील पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागातील परिस्थिती तर फारच भीषण. तेथे प्रशिक्षित डॉक्टर्स नाहीत. रुग्णालयात खाटा नाहीत, आवश्यक औषधेही नाहीत. उपनगरीय रुग्णालयांमध्येही पुरेशा सुविधा नाहीत. शहरातील आरोग्य व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. किरकोळ आजारांसाठी रुग्ण मोठ्या रुग्णालयात येतात. परिणामी तेथे गर्दी वाढल्याने यंत्रणेवरही ताण येतो. त्याशिवाय संसर्गजन्य आजारांसाठी विशेष रुग्णालये असायला हवीत.
सध्याची घटलेली रुग्णसंख्या पाहता कोरोना संपला आहे असे म्हणता येईल का?
- जून, जुलै महिन्यात कोरोनाची पहिली लाट होती. ऑगस्ट महिन्यात ती कमी झाली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील सणासुदीमध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ झाली. पुढे दिवाळी आणि नववर्षावेळी खबरदारीचे आवाहन केल्याने रुग्णसंख्येत मोठी घट झाली. त्यामुळे कोरोना सध्या नियंत्रणात आहे, पण तो संपला आहे असे म्हणता येणार नाही. आपल्या देशात कोरोनाची पहिली लाट संपली आहे. दुसरी लाट अद्याप आली नाही. लशीमुळे दुसरी लाट येणार नाही असे वाटते. पहिल्या लाटेनंतर आपण योग्य काळजी घेतली, म्हणून दुसरी लाट आली नाही. त्याशिवाय ब्रिटनमध्ये आलेला कोरोनाचा नवा प्रकार हा खरोखरच प्रभावी होता. तो फारसा धोकादायक नसला तरी त्याचा प्रसाराचा वेग मोठा असल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती, परंतु सर्वांनीच योग्य खबरदारी घेतल्याने नव्या कोरोनाचे संकट निवळले आहे.
कोरोनाचा आरोग्यावर काय परिणाम झाला?
- कठोर लॉकडाऊनच्या काळात मुंबईतीलच नव्हे, तर राज्यातील सर्वच रुग्णालयांमध्ये कोरोनाशिवाय गंभीर आजारांच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली. कर्करोग किंवा अन्य आजारांकडे अनेक रुग्णांचे दुर्लक्ष झाले. तेच रुग्ण आता गंभीर आजार घेऊन रुग्णालयात येत आहेत; मात्र लहान मुलाच्या आजारांत घट झाल्याचे निदर्शनास आले. त्यामागचे कारण म्हणजे शाळा बंद होत्या, बाहेर खेळायला जाणे बंद झाले होते, त्यामुळे सर्दी, खोकला, जुलाब असे नेहमीचे आजार कमी झाले. त्या काळात लोकांमध्ये कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली होती. अनेकांचे मानसिक स्वास्थ्यही बिघडले. मानसिक तणाव, चिडचिडेपणा आदी आजार वाढले. त्या वेळी कोरोनाबाबत खबरदारी हाच उपाय असल्याचे सांगितले गेल्याने अनेकांनी घरगुती औषधांचा वापर केला. आयुर्वेदिक औषधे, काढे घेतले. काढ्याचे अतिसेवन केल्याने मात्र काहीजणांना त्रासही झाला.
सुरुवातीच्या काळात आरोग्य यंत्रणेचा फार गोंधळ उडाला, त्यामागील कारण काय होते?
- कोरोनाचा देशात प्रवेश झाला त्या वेळी त्याबाबत कोणालाच फारसे माहिती नव्हते. त्यावर नेमके कसे उपचार करावेत, याबाबतही ठोस माहिती कुणाकडेच नव्हती. त्यामुळे गोंधळही उडाला. त्यानंतर लक्षणांनुरूप रुग्णांवर उपचार केले जात होते. केस स्टडीजनुसार उपचार पद्धती निश्चित केली जात होती. अनुभवातून आपण निर्णय घेतले आणि औषधोपचार सुरू केले. त्याचा योग्य परिणाम झाल्याचे आता निदर्शनास येत आहे.
कोरोनाचा मृत्युदर रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्यात?
- मृत्युदर रोखण्यासाठी आपल्याकडील प्रत्येक मृत्यूच्या कारणांचा अभ्यास केला. रुग्णाला कशामुळे संसर्ग झाला, कुठे झाला, परदेश प्रवासाचा काही इतिहास आहे का, कोणते उपचार घेतले, याचा इत्थंभुत अभ्यास करण्यात आला. त्या वेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की मृत्यूंमागील प्रमुख कारण म्हणजे रुग्णांचे रुग्णालयात उशिरा दाखल होणे. अनेक रुग्ण आजार अंगावर काढत होते. ही बाब लक्षात आल्याने आम्ही आरोग्य सेवकांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी पाठवले. प्रत्येक जणाची तपासणी करण्यात आली. त्यामुळे रुग्णांचे लवकर निदान होऊ लागले, वेळेवर उपचार करण्यात आले. वेळीच खाटा, ऑक्सिजन उपलब्ध करता आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले. टेलिमेडिसिनचा वापर करत ग्रामीण भागातील रुग्णालयांना मार्गदर्शन केले. त्यामुळे राज्यातील मृत्युदर कमी करण्यात आपल्याला यश झाले. आता होणारे मृत्यू हे केवळ वयस्कर किंवा दीर्घकालीन रुग्णांचेच होत आहे. त्याशिवाय आपल्याकडे गर्भवती महिलांचेही कोरोनामुळे फारसे मृत्यू झाले नाहीत. लहान बालकांनाही त्रास झाला नाही.
पोस्ट कोव्हिडमधील आजारांबाबत तुमचे काय निरीक्षण आहे?
- कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर काही जणांचे पोस्ट कोव्हिडमधील आजारांमुळे मृत्यू झाले. त्यात रक्ताच्या गाठींची समस्या प्रकर्षाने निदर्शनास आली. त्यामुळे अनेक रुग्णांच्या फुफ्फुसात पाणी जमणे, हृदयविकार, श्वसनास त्रास, चालताना धाप लागणे यासारखे आजार झाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 10 दिवसांनंतर कोरोनाचा विषाणू मृत होतो; मात्र काही रुग्णांमध्ये तो अधिक कालावधीनंतरही कायम राहतो. त्यामुळे रुग्णांनी काळजी घेण्याची अधिक गरज आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. कोरोना होऊन गेल्यावर प्रत्येक रुग्णाने किमान तीन महिने तरी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पोस्ट कोव्हिड ओपीडी पुढील वर्षभर सुरू ठेवावी लागेल. सध्या या ओपीडीमध्ये दररोज सरासरी 30 ते 35 रुग्ण येत आहेत.
कोरोना काळातील असा कुठला क्षण आहे, जो कधीच विसरता येणार नाही?
- सुरुवातीच्या काळात कोरोनाचा मृत्युदर फार वाढला होता. एकेका रुग्णालयात 25 ते 30 रुग्णांचा मृत्यू होत होता. एप्रिल-मे महिन्यात परिस्थिती फारच वाईट होती. ते पाहता मन सुन्न व्हायचे. अनेक रुग्णालयांतील मृतदेह कुणी उचलत नव्हते. अनेकदा आयसीयूमधून लोकांचे फोन यायचे की आमच्या बाजूला मृतदेह पडला आहे तो इथून हलवा, तेव्हा वाईट वाटायचे, परंतु आपण हतबल होतो. हळूहळू परिस्थती सुधारली आणि सर्व सुरळीत झाले. अनेक परिचारिका आणि डॉक्टरांना ती परिस्थिती पाहून वाईट वाटले; मात्र सकारात्मक दृष्टिकोनातून ते काम करत राहिले.
सर्वांसाठी लसीकरण बंधनकारक असावे का? तुम्हाला काय वाटते?
देशातील सर्व लोकांचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी लसीकरण मोफत असावे. मोफत नसले तरी कमीत कमी किमतीत लस उपलब्ध व्हावी. मोफत दिली म्हणजे सर्वजण लस घेतीलच असे नाही. कारण स्वाईन फ्लूची लस मोफत होती; मात्र तरीसुद्धा अनेकांनी ती घेतली नव्हती. अनेक गर्भवती महिलांनी ती लस घेण्यास नकार दिला होता; मात्र महामारी नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने लस मोफत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सध्या तरी सरकारने लसीकरण हे ऐच्छिक ठेवले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा निर्णय स्तुत्य आहे. कारण ते सातत्याने कोरोनाबधितांची सेवा करत असतात.
Exclusive Interview Corona control But its not over yet Dr Avinash Supe
---------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )