ठाण्यात तयार होणार छोटे कलाम 

रश्‍मी पाटील - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 5 जानेवारी 2017

ठाणे - मुलांना शाळेमध्ये प्रयोगशाळेत प्रयोग करायला मिळतील याची शाश्‍वती नसते. त्यामुळे त्यांना पुस्तकी ज्ञानावर समाधान मानावे लागते. ही गरज ओळखून ठाण्यातील कचराळी तलाव येथे मुलांसाठी डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्राची सुरुवात करण्यात येत आहे. उद्या (ता. 5) सायंकाळी 5 वाजता महापौर संजय मोरे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्‌घाटन होणार आहे. 

शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुभवता यावे. विविध प्रयोग व प्रात्यक्षिकांच्या माध्यमांतून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, प्रोत्साहन मिळावे यासाठी नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या पुढाकाराने "चिल्ड्रेन टेक सेंटर'च्या माध्यमातून हे केंद्र सुरू होत आहे. या केंद्रात चौथी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, रोबोटिक्‍स अशा विविध विषयांतील तीन हजारहून अधिक प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. काही प्रयोग त्यांना घरी नेता येणार आहेत. 

मुलांच्या दृष्टीने तंत्रज्ञानातील या जिज्ञासेला खतपाणी घालण्यासाठी तसेच विज्ञान व तंत्रज्ञानातील त्यांच्या शंकांना सरळसोप्या व शास्त्रीय पद्धतीने उत्तरे मिळवून देण्यासाठी या केंद्राचा उपयोग होणार असल्याचे राजेश मोरे यांनी सांगितले. 

संगीत, नृत्य, कला जर छंद असू शकतात तर मग आजच्या एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञान हे विद्यार्थ्यांसाठी छंद का नसावेत? शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञान व तंत्रज्ञानविषयक जाणिवा समृद्ध व्हाव्यात; तसेच ज्ञान-विज्ञानाच्या प्रवाहातून त्यांची बुद्धिमत्ता अधिक विकसित व्हावी, यासाठी केंद्र गरजेचे असल्याचे पुरुषोत्तम पाचपांडे यांनी सांगितले. 

असे भरणार वर्ग 
सोमवार ते शुक्रवार सकाळी व दुपारी प्रत्येकी 15 वर्ग होणार असून, शनिवार व रविवार या दोन दिवशी जास्तीत जास्त वर्ग घेण्यात येणार आहेत. या केंद्रात सहभागी होण्यासाठी 100 मुलांची नोंदणी झाली आहे.

Web Title: Experiments creativity center