द्रुतगती मार्गाला ट्रॉमा सेंटरची प्रतीक्षाच

संतोष सावंत
शनिवार, 8 डिसेंबर 2018

कळंबोली - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पाच वर्षांत २१७९ अपघातांमध्ये ६४४ जणांचा बळी गेला आहे. या घातमार्गावर जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची घोषणा जून २०१६ मध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. हे ट्रॉमा केअर सेंटर कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.

कळंबोली - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पाच वर्षांत २१७९ अपघातांमध्ये ६४४ जणांचा बळी गेला आहे. या घातमार्गावर जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची घोषणा जून २०१६ मध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. हे ट्रॉमा केअर सेंटर कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ कमी व्हावा, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी द्रुतगती मार्गाची संकल्पना मांडली होती. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे हा द्रुतगती मार्ग साकार झाला. माजी संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिलेल्या या मार्गावर सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजनांची कमतरताच आहे. कळंबोली येथे मे २००८ मध्ये झालेल्या ट्रक-जीप अपघातात १६ जणांचा बळी गेला होता, तर जून २०१६ मध्ये खासगी बसला झालेल्या अपघातात १७ जणांना जीव गमावावा लागला होता.

या अपघातानंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्‍स्प्रेस वेची पाहणी केली होती. सिद्धिविनायक ट्रस्टच्या सहकार्याने द्रुतगती मार्गालगत ट्रॉमा केअर सेंटर व हेलिपॅड उभारण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यासाठी वडगाव टोल नाक्‍यानजीक ओझर्डे गावाच्या परिसरात २० गुंठे जागेवर सहा खोल्या बांधण्यात आल्या आहेत. या खोल्या धूळ खात पडल्या आहेत. 

बाजूलाच बांधलेल्या हेलिपॅडवर आतापर्यंत हेलिकॉप्टर आले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. द्रुतगती मार्गावर २०१३ पासून झालेल्या २१७९ अपघातांमध्ये ६४४ जण मृत्युमुखी पडले आणि २५०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.

सरकारच्या या प्रस्तावाबाबत आमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. ट्रॉमा सेंटरसाठी ट्रस्टच्या अंदाजपत्रकात २०१७ पासून तरतूद केली आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नुकतीच बैठकही झाली आहे.
- आदेश बांदेकर,  अध्यक्ष, सिद्धिविनायक ट्रस्ट

नियोजन का बदलले?
९४.५ किलोमीटर अंतराच्या द्रुतगती मार्गावर खालापूर टोल नाका व वडगाव टोल नाका, या दोन ठिकाणी हेलिपॅड उभारण्याचे नियोजन होते. ऐनवेळी बदल करून खालापूर टोल नाक्‍यावर वाहनतळ व फूड मॉल उभारण्यास परवानगी देण्यात आली. हे नियोजन का बदलले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. हेलिपॅडमुळे मोठ्या अपघातांमधील जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय उपचार मिळतील, असे नियोजन होते.

नियमांचे सरार्स उल्लंघन
  एक्‍स्प्रेस वेवर वेगमर्यादा ताशी ८० किलोमीटर; प्रत्यक्षात १०० हून अधिक 
वेगाने वाहने धावतात. 
  हलक्‍या वाहनांना २३० रुपये टोल; 
म्हणजे सामान्यांवर किलोमीटरमागे दोन 
रुपये ४२ पैसे पथकर.
  नियमांनुसार अवजड वाहनांसाठी डावी मार्गिका असताना मधल्या मार्गिकेचाही 
सर्रास वापर. 
  ओव्हरटेक करताना हलक्‍या वाहनांनी पहिल्या मार्गिकेचा वापर केल्यावर पुन्हा दुसऱ्या मार्गिकेवर येणे अपेक्षित; तसे घडत नाही. 
  नागमोडी वळणांवर ताशी ४० व काही ठिकाणी ६० किलोमीटरची वेगमर्यादा असतानाही स्पीडोमीटरमधील काटा शंभरच्या वरच.

वाहनतळ न परवडण्यासारखा
ओझरडे गावाजवळची ट्रॉमा सेंटरची इमारत आहे. येथे खालापूर टोल नाक्‍याजवळ वाहनतळही आहे. दर जास्त असल्याने चालकांना हा वाहनतळ अनेकांना परवडत नाही. आपत्तीच्या काळात संपर्कासाठी दूरध्वनी केंद ही बांधण्यात आले; मात्र ते बंदच असल्याच्या तक्रारी आहेत. याठिकाणी ताशी ८० किलोमीटरची वेगमर्यादा वाहनचालकांकडून सर्रासपणे ओलांडली जाते.

Web Title: Express route Waiting for the Trauma Center