बेस्टकडून जादा दंडाची भरपाई 

बेस्टकडून जादा दंडाची भरपाई 

मुंबई : आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेल्या बेस्ट समितीला अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे 8 लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागला. बेस्टकडून वाहन अपघाताच्या 2 प्रकरणात दावेदारांना लाखो रुपये जादा द्यावे लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी ही बाब उघडकीस आणली. त्यामुळे सर्वपक्षीय सदस्यांनी बेस्ट प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. 

अगोदरच बेस्ट तोट्यात असताना अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका करून बेस्टचे आर्थिक नुकसान केले जात असून इतरांना याचा फायदा होत आहे. हे म्हणजे "आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय' असा कारभार आहे, अशी खोचक टीकाही गणाचार्य यांनी या वेळी केली. 

बेस्ट उपक्रमाच्या वाहनांमुळे एखादा अपघात झाल्यास अथवा कोणाला प्राणघातक इजा झाल्यास उपक्रमाकडून दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला आर्थिक नुकसानभरपाई देण्यात येते; मात्र त्या अपघात प्रकरणात जर बेस्टने दावेदाराचा दावा फेटाळला आणि प्रकरण न्यायालयात गेले, तर ते प्रकरण अनेक वर्षे रखडून राहते. त्यामुळे खटला, कामकाज, वकील या सर्वांवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो.

जर न्यायालयाने दावेदाराला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिल्यास बेस्टला नाईलाजाने तेवढी आर्थिक भरपाई द्यावी लागते. त्यामुळे हा खटाटोप टाळण्यासाठी बेस्ट उपक्रम दावेदारासोबत तडजोडीचा प्रयत्न करते. त्यामध्ये तडजोड झाल्यास दावेदाराला कमी रक्कम देऊन बेस्टचा फायदा करण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र बेस्टच्या काही अधिकाऱ्यांनी दावेदार मीरा संजय यादव यांना एका अपघातप्रकरणी न्यायाधिकरणाने प्रतिवर्ष 7.5 टक्के व्याजासह 21 लाख 19 हजार 200 रुपये भरपाई देण्यास सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्याने समोरच्या व्यक्तीला तब्बल 31 लाख 66 हजार 377 रुपये देण्यात आले.

मात्र त्यात अधिकाऱ्यांनी पुन्हा तडजोड केल्याने व दावेदार तयार झाल्याने त्यास 24 लाख रुपये देण्यात आले. म्हणजेच प्रत्यक्षात अगोदर देय असलेल्या 21.19 लाख रुपयांपेक्षाही 2 लाख 81 हजार 200 रुपये इतकी रक्कम जादा द्यावी लागली. त्यामुळे बेस्टचे आर्थिक नुकसान झाले, असा आरोप गणाचार्य यांनी केला. तसेच दुसऱ्या एका प्रकरणात अपघातात बेस्टने दावेदार कमला सिंह यांनी दावा केलेली 10 लाखांची भरपाई देणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व प्रकरण न्यायप्रवीष्ट झाल्याने 15 लाख 50 हजार रुपये एवढी रक्कम म्हणजे 5.50 लाख रुपये जादा रक्कम द्यावी लागली, अशी माहिती देत गणाचार्य यांनी प्रशासनाच्या सैल कारभारावर ताशेरे ओढले. 

त्यावर शिवसेनेचे आशीष चेंबूरकर, सुहास सामंत, अनिल कोकिळ आदींनी, जर बस वाहकाकडे दिवसभरात कामावर असताना पैसे कमी झाले, तर कारवाई होते आणि पैसे वाढले तर "कारणे दाखवा' नोटीस बजावली जाते, तर मग ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व बेजबाबदारपणामुळे बेस्टचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, आता त्यांच्यावर बेस्ट काय कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com