बाप्पाच्या विसर्जनासाठी पश्‍चिम रेल्वेच्या विशेष फेऱ्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी लोकलच्या आठ विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

मुंबई : मध्य रेल्वेनंतर पश्‍चिम रेल्वेवरही शनिवारी रात्री आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेष लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही दिवशी बाप्पाच्या विसर्जनामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्यरात्री लोकलच्या आठ विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. 

मुंबईतील गणपती पाहण्यासाठी आणि विसर्जनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटक शहरात गर्दी करतात. गणपती-गौरीचे विसर्जन शनिवारी; तर दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशाला 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. या दोन्ही दिवशी रात्री उशिरापर्यंत भाविकांची शहरभर वर्दळ असते. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी लोकलच्या आठ विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

या लोकल धीम्या मार्गावर चालविण्यात येणार असल्यामुळे सर्वच स्थानकांवर थांबा घेणार आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुकीमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. चचर्गेटहून रात्री 1.15, 1.55, 2.25, 3.20 वाजता सुटणार आहेत. परतीच्या मार्गावर विरारहून रात्री 12.15, 12.45, 1.40 आणि चौथी लोकल पहाटे 3 वाजता चालविण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: extra trains available for ganpati visarjan