मुंबई - शरीरसंबंधांस नकार दिल्याने वाशी येथील एका 20 वर्षीय तरुणीची तिच्या "फेसबुक फ्रेंड'ने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अंकिता मोरे असे मृत तरुणीचे नाव आहे. अंकिताची नुकतीच फेसबुकच्या माध्यमामधून हरिदास निरगुडे या 25 वर्षीय तरुणाशी ओळख झाली होती. हरिदासला भेटण्यासाठी अंकिता नालासोपारा येथे गेली होती. यानंतर तिचा मृतदेहच आढळून आला होता. या पार्श्वभूमीवर चौकशी केली असता अंकिताने शरीरसंबंधांस नकार दिल्याने हरिदासने तिची क्रूर हत्या केल्याचे स्पष्ट झाले. हरिदास याला लवकरच अटक केली जाईल, असे या प्रकरणी तपास करत असलेले पोलिस अधिकारी किशोर खैरनार यांनी सांगितले.
हरिदास याने बुटाच्या लेसने गळा आवळून तिची हत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले. हत्या केल्यानंतर हरिदासने तिझा मृतदेह घराबाहेरील जिन्यावर ठेवून दिला. हरिदासच्या घरात रक्ताचे डागही आढळून आले आहेत. अंकितावर बलात्कार झाला असण्याच्या शक्यतेची तपासणी करण्यासाठी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
अंकिता व हरिदासची काही महिन्यांपूर्वी फेसबुकच्या माध्यमामधून ओळख झाली होती. यानंतर हरिदासने तिला घरी बोलावले होते. यानुसार ती त्याच्या घरी आली होती. अंकिताने तिच्या कुटूंबीयांस या भेटीची कल्पना दिली नसावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
|