बोगस कॉलसेंटरच्या सूत्रधाराला अटक

पीटीआय
रविवार, 9 एप्रिल 2017

विमानातून उतरल्यानंतर सागर ठक्करवर कारवाई

विमानातून उतरल्यानंतर सागर ठक्करवर कारवाई
ठाणे - अमेरिकन नागरिकांना "आयआरएस' विभागातील अधिकाऱ्यांच्या नावाने फोन करून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बोगस कॉलसेंटर प्रकरणाचा सूत्रधार सागर ठक्करला अखेर पोलिसांनी पकडले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबईतून थेट दुबई गाठलेल्या सागरविरोधात "रेड कॉर्नर' नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेला ठाणे पोलिसांनी सुरवात केली होती, त्याच भीतीने तो पुन्हा मुंबईत परतल्याचे समजते.

ठाणे पोलिसांनी मीरा रोड परिसरात ऑक्‍टोबरमध्ये छापा टाकून अमेरिकन नागरिकांना फसविणाऱ्या बोगस कॉलसेंटरचा प्रकार उघडकीस आणला होता. याप्रकरणी पोलिसांनी 397 आरोपींना अटक केली होती. बनावट कॉलसेंटरचा प्रकार हा देशातील गुडगाव, अहमदाबाद, हैदराबाद, नोएडा, छत्तीसगड, कोलकाता आणि शिलॉंगमध्ये फोफावला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी सागर ठक्कर असल्याचे समोर आले होते; मात्र गुन्हा उघड होताच तो दुबईमध्ये पळून गेला होता. दुबई व थायलंडमध्ये तो फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेकडून "रेड कॉर्नर' नोटीस बजावण्यात आली होती; तर ठाणे पोलिसांकडूनही पुन्हा "रेड कॉर्नर'ची प्रक्रिया सुरू होती. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर "ब्युरो ऑफ इमिग्रेशन' व "सीएसआय एअरपोर्ट' यांनी त्याला ताब्यात घेऊन ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून आवश्‍यक कागदपत्रे आणि चार हजार 890 दुबई दिनार चलन, दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 397 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केल्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?
ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील मीरा रोड परिसरात काही व्यक्ती बनावट कॉलसेंटरद्वारे परदेशी नागरिकांची फसणवूक करत असल्याची ठाणे गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हरिओम आयटी पार्क बिल्डिंग, ओसवाल पॅरेडाईज आणि एमबाले हास येथे छापा टाकून कॉलसेंटरचा पर्दाफाश केला होता.

याद्वारे अमेरिकन नागरिकांना "इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिसेस'चे (आयआरएस) अधिकारी असल्याचे सांगून, तुम्हाला टॅक्‍स डिफॉल्टर असल्याची धमकी देत होते. अमेरिकन नागरिकांकडून आयट्यून कार्डस, टारगेट कार्डस, व्हेनिला कार्डस, मनीग्रामद्वारे व रोख स्वरूपात यूएस डॉलरच्या कोट्यवधींच्या रकमांची मागणी करून नागरिकांची फसवणूक करीत होते.

कोण आहे सागर ठक्कर?
मीरा भाईंदर परिसरात सागर ठक्कर राहत आहे. अवघ्या पंधराव्या वर्षी त्याने मोटार खरेदी- विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातून त्याचा बोगस कॉलसेंटर चालवणाऱ्यांशी संपर्क आला. त्याने शाळकरी मित्रांच्या मदतीने कॉलसेंटर विस्तृत स्वरूपात विकसित करून आतापर्यंत 6400 हून अधिक अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली आहे.

अमेरिकन यंत्रणेला चकवा
बोगस कॉल सेंटरमध्ये स्क्रॅपिंग यंत्रणेच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना फोन केले जात होते. त्यासाठी व्हाइट पेज टेलिफोन डिरेक्‍टरीचा वापर करून नंबरवरून नागरिकांची माहिती मिळवली जात होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका वेळी हजारो नंबरवर कॉल केले जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे अमेरिकन यंत्रणांनाही या कॉलसेंटरने चकवा दिल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: fake call center scam chief arrested

टॅग्स