लोकलमध्ये बोगस पोलिसांचा सुळसुळाट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

तिकीट तपासनीसामुळे आतापर्यंत पाच बनावट पोलिसांना अटक 

मुंबई : लोकलमधून फुकट प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे पोलिसांचा बनावट पास बनवून प्रवास करण्याची नवीन शक्कल काही भामट्यांनी लढवली आहे. मात्र, रेल्वे तिकीट तपासनीसांच्या दक्षतेमुळे मध्य रेल्वेवर पाच बनावट पोलिसांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बोगस पोलिसांचा प्रश्‍न आता ऐरणीवर आला आहे. 

फुकट्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने विशेष मोहीम सुरू केली आहे. यामधून बचाव होण्यासाठी काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांचा बनावट पास बनवण्यास सुरुवात केली. मात्र, काही रेल्वेस्थाकातील तिकीट तपासनीसांच्या दक्षतेमुळे मध्य रेल्वेवर एका महिन्यात पाच बनावट पोलिसांना अटक करण्यात आली आहे.

नुकतेच तिकीट तपासनीस नवीनकुमार सिंग यांना विशेष चेकिंग मोहिमेसाठी दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 6 वर नेमण्यात आले होते. यादरम्यान 11.30 वाजताच्या सुमारास दादर रेल्वेस्थानकात सीएसएमटी फास्ट लोकल आली. मोटरमनच्या बाजूकडील पहिल्या वर्गाच्या डब्यातून एक प्रवासी स्थानकावर उतरला, त्यावेळी तिकीट तपासनीस सिंग यांनी त्याच्याकडून तिकीटाची मागणी केली असता त्याने मी जीआरपी स्टाफ असल्याचे सांगितले. तेव्हाच सिंग यांनी त्याला जीआरपी पोलिसांचे ओळखपत्र मागितले असता त्याने सिंगशी हुज्जत घातली.

या बोगस पोलिसाने परिधान केलेले काळ्या रंगाचे बूट तसेच खाकी रंगाची पॅंट दाखविली. मात्र, त्याच्या बेल्टवर कुठलाही नंबर नव्हता. त्याच्याकडे ओळखपत्र मागितले असता, तो ओळखपत्र दाखविण्यासाठी टाळाटाळ करू लागला. सिंग यांनी त्या प्रवाशाची सखोल चौकशी केली असता तो पोलिस नसल्याचे समोर आले.

त्यामुळे त्वरितच सिंग यांनी याची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदविला आहे. आतापर्यंत राहुल माळी, कुमार मोरे, महेश कांगणे आणि राजू मदा यांना घाटकोपर, दादर, सीएसएमटी आणि ठाणे रेल्वेस्थाकांवर तिकीट चेंकिगदरम्यान पकडण्यात आले आहे. 

पोलिसांकडून तपास सुरू 

आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींकडून पोलिसांचे बनावट ओळखपत्र पोलिसांनी जप्त केले आहे. या ओळखपत्रावर पोलिसांचा स्टॅम्प कुठून मिळवला आणि बोगस कागदपत्र तयार करण्यास पोलिस खात्यातील कोण मदत करत आहे का? या सर्वाचा तपास लोहमार्ग पोलिस करत आहेत. मात्र, दिवसेंदिवस वाढत असलेल्या बोगस पोलिसांची संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेचे तिकीट तपासनीस आता सावध झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake police in local train