कौटुंबिक वाद टिपण्यासाठी घरात सीसीटीव्ही कॅमेरे ; वसई न्यायालयाची परवानगी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

न्यायालयाचा आदेश म्हणजे स्त्रीत्वावर घाला आहे. या आदेशानुसार घरात सीसी टीव्ही बसवण्यात आल्याने माझ्या खासगीच्या हक्कावर गदा आली आहे. 
- याचिकाकर्त्याची सून 

नालासोपारा : मुलगा व सून त्रास देतात, असा आरोप करत वारंवार भांडणे टिपण्यासाठी घरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याची सासऱ्याने केलेली मागणी वसईतील सहदिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) मान्य केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार घरात पाच कॅमेरे बसवण्यातही आले आहेत; मात्र त्यामुळे एका स्त्रीच्या स्वातंत्र्यावर तसेच खासगीपणाच्या हक्कावर गदा येत असल्याचा दावा करत सुनेने या आदेशास आक्षेप घेतला आहे. त्याविरोधात तिने राष्ट्रीय महिला आयोग, मानवी हक्क आयोग तसेच जिल्हा मुख्य न्यायाधीशांकडे तक्रारही केली आहे. 

मुलगा व सून त्रास देत असल्याचा आरोप करत वसईनजीकच्या नायगाव-खोचिवडे येथे राहणाऱ्या महादेव म्हात्रे (नाव बदललेले) यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. मुलाला पत्नीसह स्वतंत्र राहण्यास सांगावे, तसेच आमच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी खर्च द्यावा, अशी मागणी त्यांनी त्याद्वारे केली आहे. आपल्या आरोपांस पुष्टी मिळावी, यासाठी वारंवार होणारे वाद टिपण्याकरिता घरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, या आशयाचा अर्जही न्यायालयात केला होता.

6 एप्रिलला त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने यांच्या घरात कॅमेरे बसवण्याची परवानगी दिली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीसी टीव्हीच्या फूटेजची सीडी न्यायालयात सादर करावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. या आदेशानंतर म्हात्रे यांनी घरात पाच सीसी टीव्ही बसवले आहेत. 

हा निकाल देताना न्यायालयाने महिलांच्या खासगीपणाच्या अतिशय संवेदनशील मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे. या आदेशामुळे माझ्या अशिलाच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला आहे.

त्याविरोधात आम्ही ठाणे जिल्हा न्यायालयात दाद मागितली आहे. आदेश देणाऱ्या न्यायाधीशांवर कारवाई न झाल्यास वकील संघटनेतर्फे न्यायालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. 

- अॅड. नोएल डाबरे, सुनेचे वकील 

Web Title: Family Disputes CCTV Camera Vasai Court