कुटुंब नियोजनासाठी महिलांचाच पुढाकार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

सुशिक्षित-अशिक्षित फरक नाही 

कुटुंब नियोजनासाठी पुढे येणाऱ्या महिलांत सुशिक्षित-अशिक्षित असा फरक राहिलेला नाही. नको असलेली गर्भधारणा टाळण्याच्या पर्यायांबाबत महिला पुढाकार घेऊन विचारणा करतात, अशी माहिती भांडुपच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील डॉ. कृत्तिका मोरे यांनी दिली.

मुंबई - कुटुंब नियोजन किंवा दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्याबाबत महिलांमधील जागरुकता वाढत असल्याचे डॉक्‍टरांचे मत आहे. शस्त्रक्रियेपेक्षा कॉपर टी किंवा इंजेक्‍शन या पर्यायांना महिला पसंती देत आहेत, असे डॉक्‍टरांनी सांगितले. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांनाच पुढे केले जाते. आजही नसबंदीसाठी येणाऱ्या पुरुषांचे प्रमाण कमीच असल्याकडे डॉक्‍टरांनी लक्ष वेधले. 

 

गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केल्याने अनेकदा महिलांना हार्मोनचे असंतुलन, मासिक पाळीच्या तक्रारी आणि गोळ्या बंद केल्यावर गर्भधारणेत अडचणी येणे असे त्रास होतात. त्यामुळे नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी शस्त्रक्रिया करणे अथवा गोळ्या घेण्याऐवजी महिला आता गर्भनिरोधक इंजेक्‍शन अथवा कॉपर टी या उपायांना पसंती देत आहेत, अशी माहिती डॉक्‍टरांनी दिली. 

 

दोन मुले असलेल्या महिलांना माहिती दिल्यास त्या प्रसूतीनंतर कॉपर टीचा पर्याय निवडतात. खासगी दवाखाने आणि रुग्णालयांत जाऊन गर्भनिरोधक इंजेक्‍शन घेण्याचा सध्या "ट्रेण्ड‘ आहे, असे नोव्हा फर्टीलिटीच्या डॉ. स्नेहा साठ्ये यांनी सांगितले. भिवंडीसारख्या लहान शहरातही गर्भनिरोधक इंजेक्‍शन घेण्याकडे महिलांचा कल असल्याचे सांगण्यात येते. तेथील फॅमिली प्लॅनिंग ऑफ इंडिया या संस्थेत काम करणाऱ्या डॉ. कल्याणी केळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिश्र वस्ती असलेल्या भिवंडीत कुटुंब नियोजनासाठी महिलाच पुढे येतात. कॉपर टी आणि इंजेक्‍शन या पर्यायांना त्यांची पसंती असल्याचे आढळते. यात मुस्लिम महिलांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे डॉ. केळकर यांनी सांगितले. 

 

भायखळा येथील जे. जे. रुग्णालयातही कॉपर टीचा पर्याय स्वीकारणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठे आहे, असे प्रसूती आणि स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. रेखा डावर यांनी सांगितले. कॉपर टी 10 वर्षांनंतरच बदलावी लागते, त्यामुळे ही बाब महिलांसाठी सोईस्कर ठरते, असे त्या म्हणाल्या. पुरुष मात्र आजही नसबंदीसाठी पुढे येत नाहीत, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: The family planning initiative womens