उत्पन्न वाढवा, बक्षीस मिळवा! एसटीची विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

तोट्यातील एसटी महामंडळाने आगारांसाठी विशेष मोहीम आणली आहे... वाहतूक विभागाने सुरू केलेल्या `उत्पन्न वाढवा` विशेष अभियानांतर्गत मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या एसटी आगारांना दरमहा दोन लाख रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. 

मुंबई : एसटी महामंडळाची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक विभागाने सुरू केलेल्या `उत्पन्न वाढवा` विशेष अभियानांतर्गत मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या एसटी आगारांना दरमहा दोन लाख रुपये रोख बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली. निकृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारातील जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षेचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.

हे वाचलं का? : रेल्वेचा आरोग्यदायी फंडा ः अवघ्या ६० रुपयांत १६ चाचण्या!

एसटी महामंडळाच्या वतीने १ मार्च ते ३० एप्रिलदरम्यान `उत्पन्न वाढवा` विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. एसटीचे प्रवासी उत्पन्न वाढावे यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी पहिल्याच बैठकीत दिले होते. त्यानुसार महामंडळाच्या वाहतूक विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली. परब यांनी स्पर्धेच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानुसार एसटी महामंडळाच्या २५० आगारांची प्रदेशनिहाय विभागणी केली जाणार आहे. प्रत्येक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या आगाराला दरमहा दोन लाख रुपये, द्वितीय क्रमांकाच्या आगाराला दीड लाख रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या आगाराला एक लाख अशी बक्षिसे दिली जातील.

हेही वाचा : पु. ल. देशपांडे अकादमीचे कलादालन तोट्यात

एसटी महामंडळाच्या ३१ विभागांपैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकाला दोन लाख, द्वितीय क्रमांकाला दीड लाख आणि तृतीय क्रमांकाला सव्वा लाख रुपये अशी रोख बक्षिसे देण्यात येतील. विशेष म्हणजे, स्पर्धात्मक अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांना बक्षिसाने गौरवण्यात येणार आहे.

हे वाचाच : मुंबईत जगभरातील दीड हजार नर्तक एकत्र येणार... 

निकृष्ट कामगिरीबद्दल शिक्षा
निकृष्ट कामगिरी असलेल्या आगारातील संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षा करण्याचाही प्रस्ताव आहे. त्यानुसार निकृष्ट कामगिरी असलेल्या आगारातील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल राखून ठेवणे, त्यांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली करणे अथवा कारवाई करणे, असे शिक्षेचे स्वरूप राहील, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले. त्यामुळे केवळ बक्षिसासाठी नव्हे; तर शिक्षेपासून वाचण्यासाठी सर्व २५० आगारांनी कार्यक्षमता वाढवावी हा हेतू आहे, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase Income, Earn Rewards! The special mission of State Transport