निवडणुकीमुळे शेतकरीराजा वाऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

जिल्ह्यात सराईचा म्हणजेच भातकापणीचा हंगाम सुरू असताना गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले भातपीक भिजले. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी हवालदिल झाला असून, नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणा व्यस्त असल्याने नुकसानीचे पंचनामे कोण करेल, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

ठाणे : जिल्ह्यात सराईचा म्हणजेच भातकापणीचा हंगाम सुरू असताना गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले भातपीक भिजले. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी हवालदिल झाला असून, नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणा व्यस्त असल्याने नुकसानीचे पंचनामे कोण करेल, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

   भिवंडीत हळवे व गरवे अशी सुमारे १८ हजार हेक्‍टर क्षेत्रात भातशेती करण्यात आली आहे. त्यापैकी २ हजार हेक्‍टर क्षेत्रात हळवे पीक घेण्यात आले असून ते पीक पूर्णतः तयार झाल्याने शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी भात पिकाची कापणी करून ते घरात आणण्यासाठी लगबग सुरू केली होती. बहुतांश भागात शेतकऱ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून हळव्या भाताची कापणी केली. मात्र परतीच्या पावसाने कापणी केलेल्या भाताची करपे शेतातली पाण्यात तरंगू लागली आहेत.

   शहापूर तालुक्‍यात १४ हजार हेक्‍टर भू क्षेत्रात भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. तसेच नाचणी व वरईचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भातपिकाला पूरक असा पाऊस झाल्याने गेल्या कित्येक वर्षांत शेतकऱ्यांना बघायला मिळाले नव्हते, असे दर्जेदार पीक यंदा आले होते. पेरणीपासून १२० ते १३० दिवसांनी पिकणाऱ्या गरवा प्रकाराच्या भाताच्या प्रजातीसाठी पाण्याची थोडीफार गरज असली, तरी १०० ते ११० दिवसांनी पिकणाऱ्या हलवार जातीसाठी पाणी गरजेचे नाही. ऑक्‍टोबरच्या सुरुवातीपासून पावसाने उघडिप दिल्याने भातकापणीला सुरुवात झाली होती. या वर्षी तरी आपल्या पदरी विनासंकट भातपीक पडेल, अशी अपेक्षा असताना ऐन सुगीच्या हंगामात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. 

   मुरबाडमधील १४ हेक्टर क्षेत्रात भातशेतीची लागवड यंदा करण्यात आली आहे. पाऊस चांगला झाल्याने पिक चांगले येईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा हेोती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शेतात कापून ठेवलेले भातपीक उचलणे शेतकऱ्यांना शक्‍य नाही. तसेच आडवे पडलेले भातपीक कापणेही शक्‍य नाही. नारिवली, बांधिवली परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी बांधिवली येथील शेतकरी भास्कर केदार, यांनी केली आहे. 

‘विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कृषी कार्यालयातील सर्व कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असून पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल देणे अशक्‍य आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान दुर्दैवी आहे.
- दिलीप कापडणीस,कृषी अधिकारी, शहापूर

अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान 
झाले आहे. कापलेली रोपे भिजून पेंढा काळा पडेल व भाताचे दाणे कुजणार असल्याने निवडणुकीनंतर तरी पंचनामे व्हावेत.
- भाऊ बर्डे, प्रगतशील शेतकरी, बर्डेपाडा-किन्हवली
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are in loss due to elections