शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळवून देणार : रायगड जिल्हा शेतकरी संघटना

अमित गवळे
शुक्रवार, 26 जुलै 2019

- सुधागड तालुक्यातील दिडशेहून अधिक शेतकऱ्यांना अठ्ठावन्न लाख 30 हजार 518 इतक्या रकमेचा आंबा पिक विमा अजून मिळालेला नाही.

- या शेतकऱ्यांना विमा रक्कम आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हरीचंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात संघटनेची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.

पाली : सुधागड तालुक्यातील दिडशेहून अधिक शेतकऱ्यांना अठ्ठावन्न लाख 30 हजार 518 इतक्या रकमेचा आंबा पिक विमा अजून मिळालेला नाही. या शेतकऱ्यांना विमा रक्कम आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हरीचंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शासनदरबारी आवाज उठविण्यात आला आहे. यासंदर्भात सुधागड तालुक्यातील मानखोरे विभागातील भेलीव गावात शेतकरी संघटनेची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. 

याबाबत रायगड जिल्हा शेतकरी संघटना उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष हरिच्छंद्र शिंदे यांनी सांगितले. रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ पाली सुधागड शाखेने रक्कम अदा करण्याचे आदेश  ता.14 मे यादिवशी दिले होते.

त्याची अंमलबजावणी अजूनही न झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या आदेशाची अंमलबजावली न झाल्याने रायगड जिल्हा शेतकरी संघटना उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाली व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता आंबा पीक विम्या संबंधित रक्कम विमा कंपनी (मुंबई) कडून जमा झाली नसल्याचे सांगून त्यांनी आपली जबाबदारी झटकुन लावली आहे. 

या बैठकीत पुढील आंदोलनाची रणनीती ठरविण्यात आली. आंबा पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिच्छंद्र शिंदे, कार्याध्यक्ष तानाजी खाडे, सुधागड तालुकाध्यक्ष गणपत दळवी, उपाध्यक्ष संदीप डिंगले, सचिव गणपत साजेकर, अंकुश धनावडे, जिल्हा सदस्य कैलास दळवी, दिलीप कुडले आदींसह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्तीत होते. यावेळी आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers will get insurance money says Raigad District Shetkari Sanghatana