esakal | मुंबईतल्या पाच टोलनाक्यांवर आजपासून मासिक पासधारकांसाठी फास्टटॅग अनिवार्य
sakal

बोलून बातमी शोधा

Fastag

पाच टोलनाक्यांवर आजपासून मासिक पासधारकांसाठी फास्टटॅग अनिवार्य

sakal_logo
By
प्रशांत कांबळे :सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाच टोलनाक्यांवर आता 100 टक्के फास्टॅग अनिवार्य करण्यासाठी मासिक पास धारकांना सुद्धा फास्टॅग अनिवार्य केले आहे. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी झाली असून फास्टटॅग नसल्यास मासिक पास मिळणार नसल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केली आहे.

मुंबईच्या प्रवेशद्वारावरील वाशी, ऐरोली, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), एलबीएस मार्ग (मुलुंड) आणि दहिसर या टोल नाक्यावरुन मासिक पास घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. 27 एप्रिलनंतर या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असून यानंतर टोल नाक्यावर प्रत्यक्ष जावून रोख रक्कम देऊन मासिक पास खरेदी करता येणार नाही. तर बँकेस ऑन लाईन पध्दतीने पासची रक्कम हस्तांतरण करून फास्टॅगच्या द्वारे मासिक पास घेता येणार आहे. मात्र वाहनधारंकाकडे फास्टॅग नसल्यास मासिक पास मिळणार नसल्याचे एमएसआरडीसी प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा: हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत अशी आहे कोरोनाची परिस्थिती

एमएसआरडीसी, आयसीआयसीआय बँक आणि एमईपी एन्फ्रास्ट्रक्चर (कंत्राटदार) यांच्यामध्ये झालेल्या करारनाम्यानुसार ही सुविधा देण्यात येणार आहे. या सुविधेमुळे साधारणपणे 22 हजार ते 25 हजार वाहन धारकांना या सुविधेचा फायदा होणार आहे. तसेच मुंबई पथकर नाक्यावरील गर्दीच्या वेळेची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदतच होईल. मुंबई प्रवेश द्वारावरील 4 पथकर नाक्यावर दोन्ही बाजूस फास्टॅगसाठी आरक्षित मार्गिका उपलब्ध केल्यामुळे फास्टॅग वाहनधारकाची संख्या सतत वाढत असून वाहतूक कोंडी घट होईल असे पथकर प्रशासन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक कमलाकर फंड यांनी सांगितले आहे.

राजीव गांधी सागरी सेतूवरील दोन्ही बाजुच्या सर्वच मार्गिका फास्टॅग लेनमध्ये बदलण्याचा 26 जानेवारीचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यानुसार वाशी, ऐरोली येथील पथकर नाक्यावर सर्व मार्गिका फास्टॅग मध्ये रुपांतरीत करणेचे काम सुरु असून येत्या काही दिवसात सर्व मार्गिकामध्ये फास्टॅग यंत्रणा कार्यान्वीत होईल असा विश्वास फंड यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा: Lockdown ची दहशत! टॅक्सी चालकांनी उचललं टोकाचं पाऊल

ऑनलाईनसाठी दोन पर्याय

वाहनधारकासाठी ऑनलाईन पद्धतीमध्ये 2 पर्याय देण्यात आले आहे. यामध्ये पहिला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे संकेतस्थळ www.nhai.org आणि दुसरा पर्याय icicibankfastaglogin द्वारे मासिक पासची रक्कम बँकेस हस्तांतरण करून त्यामधून मिळणाऱ्या पावतीवरील क्रमांक संबधित पथकर नाक्यावर तिन दिवसाचे आत जाऊन त्यानुसार मासिक पास कार्यान्वित करुन घ्यावा लागणार आहे. मुदतीत पास कार्यान्वित नाही केल्यास केल्यास पास आपोआप रद्द होऊन तेवढी रक्कम वाहन धारकाचे खात्यात परत जमा होणार आहे.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Fasttag now mandatory for monthly pass holders implementation from today

loading image