पुनर्वसनाकरीता मच्छीमार व्यावसायिकांचे उपोषण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

सिडको प्रशासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित गावांमधील मासेमारी करणाऱ्या समाजाच्या पुनर्वसनासंदर्भात निर्णय न घेतल्याने मच्छीमार बांधवांनी सिडको कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली.

मुंबई : सिडको प्रशासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित गावांमधील मासेमारी करणाऱ्या समाजाच्या पुनर्वसनासंदर्भात निर्णय न घेतल्याने मच्छीमार बांधवांनी गुरुवारपासून (ता.१) सिडको कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. जय हनुमान कराडी, कोळी, मच्छीमार संघटना, वाघिवली गाव व अखिल किसान सभा यांच्यातर्फे हे आंदोलन केले जात आहे. 

विमानतळाकरिता झालेल्या भरावामुळे दोन वर्षांपासून वाघिवली व परिसरातील इतर गावांमधील कराडी, कोळी, आगरी, आदिवासी समाजातील मच्छीमार बांधवांचा व्यवसाय बंद आहे. या ठिकाणी प्रामुख्याने होडीच्या माध्यमातून, डोल व वाना लावून तसेच पाग, आसू किंवा हाताने मासे पकडण्याचा व्यवसाय केला जातो. त्यामुळे विमान क्षेत्रातील तलावांचे पंचनामे करून तत्काळ बधितांचे पुनर्वसन करावे व भरपाई द्यावी, अशी मागणी मच्छीमार समाजाने केली आहे. याबाबत अखिल किसान सभेचे संजय ठाकूर यांनी सांगितले, की सिडको प्रशासनामार्फत प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाबाबत जी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती, त्यात मच्छीमारांच्या पुनर्वसनाचा उल्लेख केलेला नाही.

मच्छीमार व्यावसायिकांची मागणी
 होडीवाल्यांना सरासरी एक कोटी ५० लाख रुपये.
 डोल व वाणा असणाऱ्यांना ९० लाख रुपये.
 पाग, आसू असणाऱ्यांना ८५ लाख नुकसान भरपाई द्यावी.
 सिडकोने मरिन प्रशिक्षण देणारी संस्था उभारावी
 जलवाहतूक व्यवसायात मच्छीमारांना भागिदारी द्यावी.
 आधुनिक, प्रशस्त मच्छीमार्केट व मत्स्य ओरक्रिया केंद्र उभारावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fasting of fishermen for rehabilitation in Navi Mumbai