तीन महिन्यांचं शाळेचं शुल्क केलं माफ, कोरोना संकटात पुन्हा दाखवली माणुसकी...

तेजस वाघमारे
Thursday, 6 August 2020

लॉकडाउनच्या काळात रोजगार, नोकरी गमावल्याने अनेक पालकांपुढे मुलांच्या शिक्षणासाठी शुल्क कसे भरायचे याचा यक्षप्रश्न पडला आहे.

मुंबई : लॉकडाउनच्या काळात रोजगार, नोकरी गमावल्याने अनेक पालकांपुढे मुलांच्या शिक्षणासाठी शुल्क कसे भरायचे याचा यक्षप्रश्न पडला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना मालाड मालवणी येथील शाळेच्या संस्था चालकाने पुन्हा सर्व विद्यार्थ्यांचे तीन महिन्यांचे शुल्क माफ केले आहे. पदरमोड करून मुलांच्या पालकांना अन्नधान्य वाटप केल्याने संस्थाचालकांला आता समाजातील दानशूर व्यक्तीकडून मदत होऊ लागली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांनाही मदत केली असून आतापर्यंत त्यांना सुमारे 30 लाख रुपये मिळाले आहेत.

मोठी बातमी दमदार पावसाने मुंबईला दोन दिवसात दिला तब्बल 23 दिवसांचा पाणीसाठा, जाणून घ्या कोणत्या तलावात किती पाणीसाठा...

मालाड मालवणी येथील अंबुजवाडीत झील इंग्लिश स्कुलचे संस्थाचालक मिर्झा शेख यांनी शाळेतील विदयार्थांचे तीन महिन्याचे शुल्क माफ केले होते. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. याची माहिती मिळताच त्यांना विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यांच्या कामाची महती सर्वदूर पोचत असल्याने त्यांच्याकडे मदतीची याचना होऊ लागली आहे. बारावीत शिक्षण घेत असलेल्या इमरान या विद्यार्थाकडे महाविद्यालय शुल्काची मागणी करू लागल्याने या मुलाच्या पालकांनी शेख यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी तातडीने साडे तीन हजार रुपयांची मदत दिली. अशाच दोन विद्यार्थाना त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मदत केली आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेख यांनी शिक्षण, आरोग्य आणि अन्नधान्य वाटप असे उपक्रम कोरोनानंतर जनजीवन सुरळीत होईपर्यंत राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यांना पवई, गोरेगाव आणि अन्य ठिकाणांहून अन्नधान्य पुरविण्यासाठी मागणी झाली आहे. त्यानुसार त्यांनी या भागातील 350 लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी - मुंबईच्या मुसळधार पावसात चक्क वाहत आलं हरीण, तासभराच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर 'असं' मिळालं जीवदान

आनंद महिंद्रा यांची मदत : 

मिर्झा शेख यांच्या कामाची दखल प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दखल घेतली आहे. मुलांचे शिक्षण आणि लोकांना अन्नधान्य पुरविण्यासाठी महिंद्रा यांनी चार लाख रुपयांची मदत केली आहे. महिंद्रा यांनी या कामाबाबत तब्बल वीस मिनिटे फोनवर चर्चा केली, हीच मोठी कामाची पोचपावती असल्याचे मिर्झा यांनी सांगितले.

ओडिशातील व्यक्तीला केले आत्महत्येपासून प्रवृत्त

शालेय मुलांचे शुल्क माफ केल्याची माहिती ओडिशातील एका व्यक्तीस समजली. कोरोनाच्या काळात नोकरी नसल्याने दोन वेळच्या जेवणाची भ्रांत त्यांना पडली होती. पैसे नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती मिर्झा यांना दिली. त्यांनी या व्यक्तीला अकाउंटवर काही रक्कम पाठवून आत्महत्येपासून प्रवृत्त केले.

( संकलन - सुमित बागुल ) 

Fayyaz and Mizga Shaikh wave offs school fees for next three months


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fayyaz and Mizga Shaikh wave offs school fees for next three months