ठाण्याच्या एफडीए कार्यालयात "बुवा'गिरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मे 2019

ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कार्यालयात "बुवा' नावाच्या चायवाल्याची चलती आहे. जप्त केलेल्या औषधांचा साठा सील करण्यापासून अधिकारी तसेच कार्यालयात येणाऱ्या खासगी व्यक्तींच्या बैठका ठरवण्याची महत्त्वपूर्ण कामे हा चायवाला करत आहे.

मुंबई - ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कार्यालयात "बुवा' नावाच्या चायवाल्याची चलती आहे. जप्त केलेल्या औषधांचा साठा सील करण्यापासून अधिकारी तसेच कार्यालयात येणाऱ्या खासगी व्यक्तींच्या बैठका ठरवण्याची महत्त्वपूर्ण कामे हा चायवाला करत आहे. एफडीए कार्यालयातील अधिकाऱ्यांचेच या चायवाल्याला अभय असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

एफडीएकडून अनेक वेळा दुकाने, गोदामांमधून संशयास्पद औषधांचा साठा जप्त केला जातो. हा जप्त केलेला साठ योग्य पद्धतीने सील करून त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. हे काम औषध निरीक्षकाचे असते; मात्र ठाण्यातील औषध निरीक्षकांना कायदेशीररीत्या अशी "क्षुल्लक' कामे करण्यास वेळ नाही. यासाठी त्यांनी एका चायवाल्यावर जबाबदारी दिली आहे. "सकाळ'ने मिळवलेल्या एका व्हिडीओमधून हा प्रकार उघड होत आहे. 

या व्हिडीओत एक व्यक्ती जप्त केलेली औषधे सील करताना दिसत आहे. बाजूला त्याच्या चहाचे थर्मासही दिसत आहे. ही व्यक्ती बुवा नावाचा चहावाला आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

ही औषधे सील करण्याची महत्त्वाची जबाबदारीच फक्त चहावाल्यावर नाही, तर कार्यालयातील अनेक बैठकांच्या नियोजनाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. अधिकाऱ्यांच्या बैठका हा चहवालाच ठरवतो. त्याचबरोबर बाहेरून "कामा'साठी येणाऱ्यांच्या बैठकाही हाच ठरवतो. या कार्यालयातील बड्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतल्या चहावाल्याला कोणत्याही केबिनमध्ये शिरण्यास अटकाव करण्याची हिंमत एकाही अधिकाऱ्याची नाही. या कार्यालयातील सर्व मॅनेजमेंट हाच बुवा सांभाळतो. याबाबत माहिती घेण्यासाठी ठाणे एफडीएचे सह आयुक्त विजय पौनीकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही; तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाईल असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FDA office Thane