रायगडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती; जिल्हा प्रशासनाचा रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा

रायगडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती; जिल्हा प्रशासनाचा रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा

अलिबाग: कोरोना संसर्ग कमी होत असताना अनलॉक प्रक्रियेचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात दिवाळीचा उत्साह सुरू असून नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यातच आता पर्यटनस्थळांबरोबर, प्रार्थनास्थळे सुरू होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊन कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन शक्‍य नसल्याने नागरिकांनीच स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

रायगड जिल्ह्यात कोरोनाचे दोन टक्‍क्‍यांहूनही कमी रुग्ण आहेत. सुमारे 90 टक्के खाटा रिकाम्या आहेत. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येण्यास कधीही सुरुवात होण्याची शक्‍यता असल्याने खाटांची संख्या आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली नाही. सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले की, कोरोनाबाबत नागरिकांमध्ये भीती राहिली नाही. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. ही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास कोरोनाची साथ रोखणे कठीण जाईल. 
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे सोमवार (ता.15) पासून सुरू होत आहेत. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि अन्य नियमांची सक्ती केली जात आहे. मात्र, काही धार्मिक स्थळांमध्ये गर्दी आवरणे शक्‍य होत नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट गडद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेचे काय? 
रायगड जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. याचे शिक्षक-पालक संघांकडून स्वागत केले जात आहे. मात्र, त्यापूर्वी सर्व शिक्षकांना कोव्हिड तपासणी करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचबरोबर शाळांना सॅनिटायझर, टेंपरेचर स्कॅनर, ऑक्‍सिमीटर इत्यादी साहित्य कोणी पुरवायचे याबद्दलच्या स्पष्ट सूचना शासनाकडून अद्याप देण्यात आलेल्या नाहीत, यामुळे संभ्रमावस्था आहे. 

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवली जात असताना नागरिकांनी दिवाळी साजरी करताना सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर आरोग्यदायी दिवाळीसाठी फटाक्‍यांचा वापर कमी करावा, जेणेकरून वायुप्रदूषण कमी होऊन आरोग्य चांगले राहील. 
- अदिती तटकरे,
पालकमंत्री, रायगड 

कोरोनाबाधित रुग्ण आपल्या अवतीभोवती वावरत आहेत. मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब न करणे, आरोग्याची काळजी न घेणे यामुळे या बाधित रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो. हा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा पुन्हा लॉकडाऊन लादणे शक्‍य नाही. यामुळे नागरिकांनीच खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. 
-डॉ. सुहास माने 
जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड. 

रायगड जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती 
एकूण रुग्ण : 55505 
बरे झालेले रुग्ण 52910 
उपचार सुरू असलेले रुग्ण - 1015 
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी (दिवसांत)- 156 
संसर्गाची सरासरी (टक्‍के) 23.54 

Fear of a second wave of corona in Raigad District administration warns hospitals

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com