फेरीबोटींवर जीपीएसची नजर!

मंगेश सौंदाळकर - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई - गेट वे ते मांडवादरम्यानच्या फेरीबोटींवर जीपीएस यंत्रणा बसवली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम गेट वे आणि मांडवा येथे सुरू करण्यात येईल. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व बोटींवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात येईल. पहिल्यांदाच फेरीबोटींना जीपीएस यंत्रणा बसवली जात आहे.

मुंबई - गेट वे ते मांडवादरम्यानच्या फेरीबोटींवर जीपीएस यंत्रणा बसवली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम गेट वे आणि मांडवा येथे सुरू करण्यात येईल. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व बोटींवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात येईल. पहिल्यांदाच फेरीबोटींना जीपीएस यंत्रणा बसवली जात आहे.

राज्यातील तीन हजार बोटींच्या नोंदी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे (एमएमबी) आहेत. सर्वाधिक बोटी वांद्रे ते डहाणू या पश्‍चिम परिक्षेत्रात आहेत. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. सुरक्षेचा विचार करून बोटींवर लक्ष ठेवण्याकरता उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. गेल्या वर्षी सागरी सुरक्षेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्या वेळी बोटींवर जीपीएस बसवण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार मंडळाने गेट वे ते मांडवा या फेरीमार्गावर प्रायोगिक तत्त्वावर जीपीएस बसवण्याकरता निविदा मागवल्या आहेत. गेट वे ते मांडवा या मार्गावर साधारण ४३ बोटींतून लाखभर प्रवासी वर्षाला ये-जा करत असतात. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन राज्यात प्रायोगिक तत्त्वावर फेरीबोटींना जीपीएस प्रणाली बसवण्यात येणार आहे. त्याकरता गेट वे आणि मांडवा येथे खास कक्ष तयार केला जाईल. त्या कक्षातून बोटी नेमक्‍या कुठे जातात, बोटी निघण्याच्या वेळा, एखादी बोट अचानक नैसर्गिक कारणामुळे बेपत्ता झाल्यास त्याची माहिती मिळू शकेल. काही संशय आल्यास त्याची माहिती तटरक्षक दल, नौदलाला सहज देता येईल.

जलक्रीडेला चांगला प्रतिसाद
महाराष्ट्र सागरी मंडळाने नुकत्याच जलक्रीडेकरता निविदा मागवल्या होत्या. मुंबईतील मार्वे, जुहू तारा, मनोरी, गोराई येथे जलक्रीडेकरता अधिक निविदा आल्या आहेत. मार्वे-मनोरी, भाईंदर, गायमुख (वसई-घोडबंदर) येथे हाऊसबोटींकरता पाच निविदा आल्याची नोंद आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्याकरता बोरिवली ते एनसीपीए जल प्रवासाबाबत एकाच कंत्राटदाराने स्वारस्य दाखवले आहे.

Web Title: The ferry boats on GPS