चित्रपट, दूरचित्रवाणी चित्रीकरण कामांना वेग येणार; 'ही' असतील मार्गदर्शक तत्त्वे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

लॉकडाऊननंतर चित्रपटसृष्टीतील ठप्प झालेली काही कामे पुन्हा सुरू झाली आहेत. राज्य सरकारने अटी-शर्तींच्या अधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मनोरंजन, चित्रपट क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. 

मुंबई : लॉकडाऊननंतर चित्रपटसृष्टीतील ठप्प झालेली काही कामे पुन्हा सुरू झाली आहेत. राज्य सरकारने अटी-शर्तींच्या अधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मनोरंजन, चित्रपट क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? बेस्टनं 'त्या' कर्मचाऱ्यांवर केली कठोर कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी यांच्या चित्रीकरणासंदर्भात राज्य सरकारने 30 मे रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यांची अंमलबजावणी करताना संबंधित संस्था/संघटना यांना काही अडचणी येत होत्या. त्यामुळेच सांस्कृतिक विभागामार्फत मार्गदर्शक तत्त्वांबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले असून, संबंधित संस्थांनी या स्पष्टीकरणात्मक सूचनांनुसार कार्यवाही करावी. 

ही बातमी वाचली का? धक्कादायक ! मुंबईत आज तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू; दोन आठवड्यात 'इतक्या' पोलिसांनी गमावला जीव...

ही आहेत मार्गदर्शक तत्त्वे 

  • लॉकडाऊनपूर्वी चित्रीकरणासाठी सरकारची परवानगी घेण्याची पद्धत यापुढेही तशीच असणार आहे. 
  • चित्रीकरण करताना संबंधित निर्मात्याने आवश्‍यक त्या परवानग्या, स्व-घोषित पत्र, चित्रीकणासंबंधित सर्व माहिती चित्रनगरीला लिखित स्वरूपात कळविणे आवश्‍यक आहे. 
  • प्रतिबंधित क्षेत्र नसलेला भाग आणि निषिद्ध क्षेत्र नसलेला भाग यामध्येच चित्रीकरणाला परवानगी आहे. 
  • चित्रीकरणादरम्यान सुरक्षेचे व स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत की नाही, याची खातरजमा वेळोवेळी परवाना अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल. 
  • चित्रीकरणादरम्यान कलाकार, तंत्रज्ञ सामाजिक अंतर ठेवून चित्रीकरण करू शकतात. संबंधित निर्मात्यांनी कमीत कमी मनुष्यबळात चित्रीकरण करणे आवश्‍यक आहे. 
  • थर्मल स्क्रिनिंग, स्वच्छतेची काळजी चित्रीकरणाच्या ठिकाणी असणे आवश्‍यक आहे. चित्रीकरणाच्या स्थळी जवळील कोविड रुग्णालये याची माहिती दूरध्वनी क्रमांक निर्मिती संस्थेला असणे आवश्‍यक आहे. तसेच या ठिकाणी प्रथमोपचार पेटी, पल्स ऑक्‍सिमीटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, शुगर टेस्टिंग किट असणे आवश्‍यक आहे. 
  • चित्रीकरणस्थळी गर्दी टाळणे, कमीत कमी तंत्रज्ञांमध्ये काम करणे, मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ऍप इन्स्टॉल करणे, साधनसामुग्रीची हाताळणी, चित्रीकरणाच्या वेळी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, कार्यालयांचे, चित्रीकरण स्थळांचे सॅनिटायझेशन आदी बाबींवर भर देण्याच्या अटी-शर्ती टाकण्यात आल्या असून या अटी-शर्तींचे, शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे, निर्बंधांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालन करणे गरजेचे आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Film, television shooting work will accelerate; Guidelines issued by the State Government