अखेर जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला; परिसरात झाडेझुडपे वाढल्याने दक्ष राहण्याचे आवाहन

अखेर जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला; परिसरात झाडेझुडपे वाढल्याने दक्ष राहण्याचे आवाहन

मुरूड : आठ महिन्यांपासून बंद असलेला जंजिरा किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. सोमवारपासून (ता. 23) येथून जलवाहतूक सुरू होणार असल्याने स्थानिक व्यावसायिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तत्पूर्वी मार्च महिन्यापासून किल्ला बंद असल्याने परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने विंचू व सरपटणाऱ्या प्राण्यांपासून पर्यटकांनी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

1 जून ते 31 ऑगस्ट या काळात समुद्र खवळलेला असल्याने राजपुरी ते किल्ला सुरक्षिततेच्या कारणामुळे बंद ठेवण्यात येतो. मात्र, या वर्षी कोव्हिडमुळे हा किल्ला मार्चअखेरीस बंद करण्यात आल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या 200 कुटुबीयांची ऐन हंगामात उत्पन्न बुडाले. त्यामुळे त्यांना हालअपेष्टा सोसावी लागली. अनलॉकनंतर पर्यटनास परवानगी देण्यात आली होती. समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलू लागले; मात्र जंजिरा किल्ला सुरू नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले असूनही महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने जलवाहतूक सुरू न केल्यामुळे हा किल्ला बंद ठेवण्यात आला होता. परवाने नूतनीकरण व प्रवासी विमा न केल्यामुळे बोर्डाने जलवाहतूक सुरू केली नव्हती. परंतु, आता जलवाहतूक सोसायटीने या सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे मेरीटाईम बोर्डासह पुरातत्त्व खात्याकडून अटी-शर्तींच्या आधारावर जंजिरा किल्ला 23 नोव्हेंबरपासून खुला करण्यात आला आहे. हा किल्ला आठ महिन्यांपासून बंद असल्याने परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्यामुळे किल्ल्याची अंतर्गत स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पर्यटकांनी विंचू, सरपटणारे प्राणी यांपासून दक्ष राहणे गरजेचे आहे. 

देश-विदेशातील सुमारे 5 ते 6 लाख हौशी पर्यटकांची किल्ल्याला भेट ही पुरातत्त्व विभागासह मेरीटाईम बोर्ड आणि स्थानिक राजपुरी जलवाहतूक संस्थांना एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत आहे. यामुळे स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्नही काही अंशी सोडवला जातो. जंजिऱ्यात जाण्यासाठी अलिकडे राजपुरी व खोरा बंदर येथून प्रवासी जलवाहतुकीची व्यवस्था करण्यात येत आहे. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत किल्ला दर्शनाला परवानगी असते. 

जंजिरा जलवाहतुकीस मेरीटाईम बोर्डाने परवानगी दिली आहे. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब प्रवाशांसह बोटचालकांनी केला पाहिजे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल. 
- बी. जी. येलीकर,
सहायक संवर्धक, 
पुरातत्त्व खाते, अलिबाग-रायगड 

Finally Janjira Fort is open to tourists Appeal to be vigilant as shrubs grow in the area 

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com