तीन महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवूण, गुन्हा दाखल

अनिश पाटील
Saturday, 31 October 2020

तीन महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवूण केल्याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांनी व्यावसायिका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : तीन महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवूण केल्याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांनी व्यावसायिका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 19 जण तक्रार घेऊन पुढे आले असून त्यांनी गुंतवलेली रक्कम एक कोटीपेक्षा अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपींनी व्याज आणि मुद्दल दोनही रक्कम गुंतवणूकदारांना परत केलेली नसल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आणखी व्यक्तींची फसवणूक झाल्याचा संशय असून त्यााबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

नागपाड्यातील रहिवासी असलेले नईम इस्माईल शेख (वय 45 वर्षे ) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांचा बॅगा घाऊक दरात विकण्याचा व्यवसाय आहे. तक्रारीनुसार, शेख यांच्या व्यावसायामुळे परिचयाचे झालेल्या हाजी नबीब अली यांनी 2017 मध्ये सर्वप्रथम दामदुप्पटीच्या या योजनेबद्दल सांगितले. आमीर व रिझवान नावाच्या दोन व्यक्तींना आपण ओळख असून ते तीन महिन्यात पैसे दुप्पट करत असल्याचे अली यांनी शेख यांना सांगितले होते.

महत्त्वाची बातमी : राज्यपाल विरुद्ध राज्य, पुन्हा वाद पेटण्याची शक्यता; आमदार नियुक्तीसाठी कडक नियम?

सुरूवातीला शेख यांनी विश्वास ठेवला नाही. पण रिझवान व आमिर या दोघांचा चोरबाजारात व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यावेळी अलीच्या सांगण्यावरून शेख यांनी पाच लाख रुपये या योजनेत गुंतवले. त्यावेळी त्यांना तीन महिन्यात 10 लाख रुपये मिळाले. त्यामुळे तक्रारदाराने या योजनेबद्दल नातेवाईक व परिचीत व्यक्तींना सांगितले. त्यावेळी सात व्यक्ती या योजेनेत गुंतवणूक करण्यास तयार झाले. त्याबाबत आमीर व रिझवान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नऊ महिन्यात पैसे दुप्पट होतील, असे सांगितले. गुंतवणूकदार नऊ महिन्यांसाठी पैसे गुंतवण्यास तयार झाल्यानंतर त्यांनी पैसे भरले. पण नऊ महिन्यांनंतर कोणालाही पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर सर्वांनी रिझवान व आमीर यांच्याशी संपर्क साधण्यास सुरूवात केला. त्यावेळी त्यांनी त्यांचे दूरध्वनी उचलणे बंद केले. तसेच संपर्कही तोडला.

महत्त्वाची बातमी : मुंबई मनपा कामगार आणि कर्मचाऱ्यांचा बोनसचा तिढा सुटला, सोमवारी होऊ शकते मोठी घोषणा

त्यावेळी त्यांनी दुकानात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तेथे गेल्यानंतर ते दुकाने भलत्या व्यक्तीचेच असल्याचे निष्पन्न झाले. वारंवार तक्रार करूनही रिझवान व आमीर यांनी कोणालाही पैसे न दिल्याने अखेर त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्याचे ठरवले. शेख व त्यांच्या परिचीत सात व्यक्तींनी मिळून या योजनेत 40 लाख रुपये गुंतवले होते. त्यानंतर याप्रकरणी 19 जणांचे एक कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

अखेर याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांनी भांदवि कलम 406, 420, 34 सह महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. आरोपींची नावे प्रत्यक्षात वेगळी असल्याचा संशय आहे.

( संपादन - सुमित बागुल )

financial fraud in economic capital mumbai case registered under various articles of IPC


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: financial fraud in economic capital mumbai case registered under various articles of IPC