अनलॉकनंतरही ग्राहकांची पाठ; सणासुदीला गजबजलेल्या मुंबईकरांच्या 'या' फेव्हरेट ठिकाणाला अवकळा 

अनलॉकनंतरही ग्राहकांची पाठ; सणासुदीला गजबजलेल्या मुंबईकरांच्या 'या' फेव्हरेट ठिकाणाला अवकळा 

मुंबई : शॉपिंग करायची असेल, तर नागरिक हमखास मुंबईतील फॅशन स्ट्रीटला भेट देतात. यातील वांद्रे येथील "फॅशन स्ट्रीट' तर नेहमीच गजबजलेला. स्वस्त आणि मस्त ही वांद्य्रातील फॅशन स्ट्रीटची खासियत. त्यामुळेच संपूर्ण दिवसभर विविध वस्तू खरेदीसाठी या बाजारात गर्दी असते. सणासुदीच्या काळात हे मार्केट ग्राहकांनी तुडुंब भरलेले असते; मात्र कोरोनाच्या आक्रमणाने नेहमीच गजबजलेले फॅशन स्ट्रीट अबोल झाला आहे. लॉकडाऊनमुळे आता या प्रसिद्ध "वांद्रे फॅशन स्ट्रिट'ला अवकळा आली असून गेल्या चार महिन्यांत येथील व्यवसाय ठप्प झाला आहे. "अनलॉक'नंतरही हा बाजार अद्याप सावरलेला नाही. 

फॅशनेबल कपडे, वेगवेगळ्या प्रकारचे लेडीज शूज, ड्रेस, जिन्स सर्व प्रकारची ज्वेलरी, बॅग्स म्हणजेच महिलांना हव्या असणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींपासून ते अगदी मॉल्समधून खरेदी करता येतील, अशा सर्व वस्तू खार आणि वांद्य्राच्या लिकिंग रोडवर असणाऱ्या फॅशन स्ट्रिटवर उपलब्ध होतात. अगदी स्वस्त दरात अनेक वस्तू एकाच वेळेस खरेदी करण्यासाठी हा बाजार प्रसिद्ध आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हा बाजार हळूहळू श्वास घेण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र सकाळी 10 वाजल्यापासून दुकाने सुरू केली, तरी सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकही ग्राहक येत नसल्याची खंत येथील व्यावसायिक व्यक्त करतात. या सर्व व्यवसायावर 50 टक्‍क्‍यांहून अधिक परिणाम झाल्याचे व्यावसायिक सांगतात. 

कोरोना संसर्ग अजूनही आटोक्‍यात आलेला नाही; मात्र हे दुकानदार पोटाची खळगी भरण्यासाठी सकाळपासूनच दुकाने सुरू करतात. आज ना उद्या ग्राहक येईल, अशी आशा त्यांना आहे; मात्र सद्यस्थितीत ही आशा फोल ठरली आहे. आधीचाच माल पडून असल्याने नवा माल आणला जात नाही. त्यामुळे कामगारांच्या पोटाचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. जोपर्यंत पूर्णपणे वाहतूक सुरू होत नाही, तोपर्यंत व्यवसाय आणि हा बाजार पूर्वपदावर येणार नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

सिनेस्टारचेही आवडते ठिकाण 
वांद्रे येथील फॅशन स्ट्रीटवर केवळ सर्वसामान्यच नाही, तर मराठी आणि हिंदी सिनेजगतातील अनेक कलाकार शॉपिंगसाठी येतात. कुठल्याही प्रकारचे कपडे, कटलरी, चप्पल येथे मिळत असल्याने अनेक कलाकारांचे हे आवडीचे ठिकाण बनले आहे. शिवाय अनेक मालिका, टीव्ही शोचे शूटिंग या ठिकाणी झालेले आहेत. सध्या यावरही मोठ्या प्रमाणावर बंधने आली आहेत. 

गेल्या 10 वर्षांपासून याच मार्केटमध्ये काम करत आहे. कोरोनामुळे आता 5 टक्के व्यवसायही होत नाही. एक-दोन ग्राहक आले, तरी ते वस्तू खरेदी करताना तडजोड करतात. दिवसाला पाचशे रुपये पगार आहे; पण गेल्या तीन महिन्यांपासून तोही कमी येत आहे. 
- फिरोज अय्युब खान, चप्पलविक्रेता 

गेल्या महिन्यात व्यवसाय 100 वरून 40 ते 50 टक्‍क्‍यांवर आला आहे. आता रस्ते वाहतूक सुरू झाल्यानंतर या महिन्यात बऱ्यापैकी ग्राहक येत आहेत; मात्र ते प्रमाणही 50 टक्के आहे. त्याचा परिणाम व्यवसायावरही झाला आहे. 
- सलीम शेख, व्यावसायिक 

कोरोनाचा व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आहे. दिवसभर दुकान सुरू ठेवूनही दिवसाला फक्त दोन ते तीन बॅग्स विकल्या जातात. अशी परिस्थिती पहिल्यांदाच अनुभवली आहे. 
- राजू खान, बॅगविक्रेता 

मुली खरेदी करण्यात कायम पुढे असतात. लॉकडाऊनमध्येही खरेदी करावीशी वाटत होती; पण आता कोरोनाच्या भीतीमुळे खरेदी करावीशी वाटत नाही. आवश्‍यक गोष्टींच्या खरेदीसाठीच आम्ही बाहेर निघतो. 
- सुषमा लोखंडे, ग्राहक 

स्ट्रीट बाजारात आपल्याला सर्व गोष्टी स्वस्तात उपलब्ध होतात. आधी उत्साहाने यायचो; पण आता थोडीफार भीती आहे. शिवाय गणपती आले आहेत; तर शॉपिंग सुरू आहे. काळजी घेऊनच शॉपिंग केली जाते. 
- मिथिला तळेकर, ग्राहक 

--------------
(संपादन : प्रणीत पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com