मुंबई अग्निसंकटात!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

मुंबईत मागील सहा महिन्यांत तब्बल दीड हजार आगीच्या घटना घडल्या असून यातील जास्त घटना या शाॅर्ट सर्किटमुळे झाल्या आहेत.

मुंबई : मुंबईत आग लागण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून यातील जास्त घटना या शॉर्टसर्किट झाल्यामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे मुंबईत १ ऑक्‍टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९  या केवळ सहा महिन्यांच्या काळात आग लागणे, घरांची पडझड अशा एकूण चार हजार ३१८ घटना घडल्या असून त्यात आगीच्या एक हजार ६०८  घटना आहेत.

मुंबईतील आग विझविताना अग्निशमन दलाची मोठी कसोटी लागत आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईत उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या उंच इमारतींच्या आगी विझविणे दलासाठी अडचणीचे ठरत आहे. आगप्रतिबंधक सामग्री वापरणे हॉटेल, कार्यालये यांना सक्तीचे केले असतानादेखील काही आस्थापने या अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहेत.

अग्निसुरक्षा यंत्रणा बसवली तरी ती कार्यरत आहे की नाही, याबाबत खबरदारी घेण्याबाबतही निष्काळजीपणा दाखवला जात आहे. त्यामुळे आगीच्या घटना वाढत असल्याची बाब समोर आली आहे. पालिका क्षेत्रात १ ऑक्‍टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ या सहा महिन्यांच्या काळात चार हजार ३१८ दुर्घटना घडल्या असून त्यामध्ये केवळ आगीच्या एक हजार ६०८  दुर्घटना आहेत. या एकूण घटनांत १६४ जण जखमी झाले असून ५६ जणांचा मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire Crisis is on all over Mumbai