मुंबईची आग रोबो विझवणार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

मुंबई अग्निशमन दलात आग विझवणारा रोबो दाखल. रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने रोबो नियंत्रित करून आग विझवता येणार... 

मुंबई : मुंबई अग्निशमन दलात बुधवारी आग विझवणारा रोबो दाखल झाला. रोबोमुळे अडगळीतील आग विझवण्यासाठी जवानांना स्वत:चा जीव धोक्‍यात घालण्याची गरज भासणार नाही. रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने रोबो नियंत्रित करून आग विझवता येणार आहे. 

७०० सेल्सिअस तापमानातही रोबो सहज काम करू शकणार आहे. पालिकेने सुमारे ९५ लाख रुपये खर्च करून विकत घेतलेल्या रोबोचे बुधवारी बोरिवलीमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. ३८०० लिटर पाण्याचा फवारा रोबोमधून एका मिनिटाला करता येणार आहे.

तळमजला, बेसमेंट, चिंचोळ्या गल्ल्या आणि अडगळीच्या ठिकाणी आग विझवताना अंदाज येणे अवघड असते. धुरामुळे आगीच्या उगमापर्यंत पोहचणे जवानांना कठीण होते. रोबोचा फायदा अशा ठिकाणची आग विझवताना प्रामुख्याने होणार आहे. 

रसायनांना लागलेली आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फोमचा फवाराही रोबोमधून मारता येणार आहे. रोबोमध्ये थर्मल कॅमरे असून त्याचा वापर दिवसा आणि रात्रीच्या वेळीही होणार आहे. आगीच्या ठिकाणी दृष्यमानता नसते. मात्र, रोबोमधील थर्मल कॅमेऱ्यामुळे थेट आगीच्या उमगावर पाणी मारता येणार आहे.

असा आहे रोबो 

  •   दोन इंजिन 
  •   ४००० वॅटची बॅटरी 
  •   ३.५ किलोमीटरपर्यंत आगीत जाणे शक्‍य
  •   उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्यांमुळे रात्रीच्या वेळीही लाईव्ह व्हिडीओ आणि फोटो मिळणार 
  •   ३०० मीटरवरून परिस्थिती पाहता येणार
  •   रोबोमधील थर्मल कॅमेऱ्यामुळे आगीच्या उगमावरच थेट पाणी मारता येणार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire Extinguishing Robot IN Mumbai Fire Brigade