हिरानंदानीच्या २८ व्या मजल्यावरील घराला आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

ठाणे - ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट संकुलातील टोलेजंग इमारतीच्या २८ व्या मजल्यावरील सदनिकेला अचानक आग लागल्याची घटना रविवारी पावणेबाराच्या सुमारास घडली. 

ठाणे - ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट संकुलातील टोलेजंग इमारतीच्या २८ व्या मजल्यावरील सदनिकेला अचानक आग लागल्याची घटना रविवारी पावणेबाराच्या सुमारास घडली. 

इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा सुसज्ज असल्याने अग्निशमन दल आणि ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले; मात्र, या सदनिकेतील एक शयनगृह आगीत खाक झाला. आगीचे कारण कळू शकले नाही, अशी माहिती आपत्कालीन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली. ठाणे पश्‍चिमेकडील पातलीपाडा येथे हिरानंदानी इस्टेट समूहाचे भव्य गृहसंकुल आहे. येथील रोडास संकुलातील बॅंसकिसन या टोलेजंग इमारतीच्या २८ व्या मजल्यावरील २८०२ क्रमांकाच्या पाच बीएचके सदनिकेत सुनीता शेठ आपल्या सासू-सासऱ्यांसह राहतात. या सदनिकेला रविवारी दुपारी आग लागली. सुनीता यांचे सासू-सासरे परदेशी गेले असून सुनीताही जिममध्ये गेल्या होत्या. घरात मोलकरीण काम करीत असताना सदनिकेतील एका शयनगृहाला अचानक आग लागून सर्व फर्निचर जळून खाक झाले. याच मजल्यावर आपत्कालीन परिसर असल्याने मजल्यावरील इतर रहिवाशांनी तत्काळ सुखरूप ठिकाणी धाव घेतली. अग्निशमन दलाने इमारतीमधील अग्निसुरक्षा यंत्रणेद्वारे आगीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला.

Web Title: fire Hiranandani 28th floor