भाऊ की वैरी ! आधी मृतदेह नाकारला, मग मालमत्तेवर कब्जा केला

body
body
Updated on

ठाणे : कोरोनामुळे सध्या नातीगोती आणि माणुसकीचे खरे वास्तव अनेकांना अनुभवयास मिळत आहे. कोरोनाच्या धास्तीने इतर आजारांनी बळी पडलेल्यांच्या नशिबीही मृत्यूनंतर दुःस्वास येत आहे. ठाण्यातील शारीरिक व्याधीने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीला स्थानिक समाजसेवकांनी पदरमोड करीत सरकारी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातलग व निकटवर्तीयांनी पाठ फिरवली, तर सख्ख्या भावाने मृतदेह न स्वीकारता मृताच्या घराचा ताबा घेत परस्पर काढता पाय घेतला. गेले चार दिवस अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत हा मृतदेह कळवा रुग्णालयात खितपत पडला आहे. तेव्हा, सख्ख्या भावाच्या या कृत्याविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

ठाणे पूर्वेकडील पारशीवाडीतील बाळ सराफ चाळीनजीकच्या घरात सुरेश शेडगे हे 58 वर्षीय गृहस्थ एकटेच राहतात. खासगी बिल्डर्सकडे नोकरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेडगे यांना कंबरेच्या खाली शारीरिक व्याधी जडली होती. हा आजार बळावल्याने ते घरातच तडफडत होते. याची माहिती मिळताच 17 जूनला मध्यरात्री काँग्रेसचे स्थानिक समाजसेवक कृष्णा भुजबळ यांनी तत्काळ धाव घेऊन काँग्रेस शहर अध्यक्ष मनोज शिंदे व शिवसेनेच्या हेमंत पमनानी आदींच्या सहकार्याने रुग्ण शेडगे यांना ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ हलवले. परंतु, कोरोना नसतानाही उपचारादरम्यान 18 जूनला पहाटेच्या सुमारास शेडगे यांचा मृत्यू ओढवला.

रुग्णाच्या मृत्यूची माहिती मिळताच पुन्हा कृष्णा भुजबळ यांनी रुग्णालय गाठून मृत शेडगे यांचे भाऊ, जावई व नातलगांना कळवले; मात्र साऱ्यांनीच पाठ फिरवली. अखेर महाड येथील सख्ख्या भावाला, मृताच्या नावावर घर असल्याचे कळवताच घराच्या लोभाने रुग्णाचा भाऊ ठाण्यात अवतरला; परंतु, रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्याऐवजी या लोभी भावाने नात्यागोत्याला काळिमा फासत मृत भावाच्या पारशीवाडीतील घराला टाळे ठोकून चक्क धूम ठोकली. वारंवार फोन करूनही कुणीही नातलग येत नसल्याने मृत शेडगे यांचे शेजारी-पाजारी संतापले असून, सख्खा भाऊ देखील जबाबदारी स्वीकारायला तयार नसल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. मागील चार दिवसांपासून मृतदेह कळवा रुग्णालयातील शवागारातच बेवारस स्थितीत पडून असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

दरम्यान, एकीकडे कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यविधीला आप्तस्वकियांना नाईलाजाने मुकावे लागत असताना कोरोनाच्या धास्तीने इतर आजारांनी दगावलेल्यांच्या नशिबीही असा प्रसंग ओढवणे दुर्दैवी म्हटले जात आहे.

First the bodies were rejected, then the property was seized

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com