ठाकरे सरकारकडून चीनला धक्का, 'ते' तीन करार केले रद्द

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 22 June 2020

अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत हे करार करण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पण आता स्वाक्षरी करण्यात आलेले चीनच्या कंपन्यांसोबतचे तीन करार महाविकास आघाडी सरकारनं रोखलेत. 

 

मुंबई- सात दिवसांपूर्वी उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार. उद्योगपती ऑनलाइन उपस्थित होते. विविध 12 देशांतील गुंतवणुकदारांसोबत 16 हजार 30 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत हे करार करण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पण आता स्वाक्षरी करण्यात आलेले चीनच्या कंपन्यांसोबतचे तीन करार महाविकास आघाडी सरकारनं रोखलेत. 

आरे वसाहतीत मेट्रो कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा

महाविकास आघाडीनं स्वाक्षरी केलेल्या करारांनुसार चीनच्या कंपन्यांकडून महाराष्ट्रात 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार होती. मात्र हा करार आता थांबवण्यात आला आहे. राज्य सरकारनं केंद्र सरकारसोबत चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे. गलवान खोऱ्यातील हिंसक घटनेपूर्वीच या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती. परराष्ट्र मंत्रालयाने यापुढे चीनच्या कंपन्यांसोबत कोणतेही करार करू नये, असा सल्ला दिला होता, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

चीनचे राजदूत सन वेईडाँग यांच्या उपस्थितीत गेल्या सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्स झाली होती.  या तीन करारांमध्ये ग्रेट वॉल मोटार्स पुण्याजवळील तळेगावमध्ये 3770 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती. पीएमआय इलेक्ट्रो चीनच्या फोटोन या कंपनीसोबत एक हजार कोटींची गुंतवणूक करणार होती, ज्यातून 1500 रोजगार निर्माण अपेक्षित होतं. गुंतवणुकीचं आश्वासन दिलेल्या इतर कंपन्यांमध्ये हेंगली इंजिनीअरिंगचाही समावेश होता. या कंपनीकडून तळेगावच्या प्लांटमध्ये 250 कोटींची गुंतवणूक केली जाणार होती, ज्यातून 150 रोजगार अपेक्षित होता.

...अजूनही 9 लाख रायगडकर संपर्क क्षेत्राबाहेर! निसर्ग चक्रीवादळाचा फटका

सामंजस्य करार झालेल्या चीनच्या कंपन्या आणि गुंतवणूक रक्कम

हेंगली (चीन), इंजिनिअरिंग- तळेगाव टप्पा क्रमांक-2, पुणे 250 कोटी आणि 150 रोजगार

पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन (चीन) ऑटो-तळेगाव 1000 कोटी रोजगार 1500

ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल तळेगाव- पुणे 3770 कोटी आणि रोजगार 2042

यावर्षी जानेवारीमध्ये चीनच्या ग्रेट वॉल मोटार्सने अमेरिकेच्या जनरल मोटार्सकडून तळेगावमधील प्लांट ताब्यात घेण्यासाठी करार करण्यात आला होता. चीनच्या कंपनीकडून तळेगावात इलेक्ट्रीक आणि एसयूव्हीची निर्मिती केलं जाणं प्रस्तावित होतं. जीडब्ल्यूएमकडून तळेगावमध्ये अत्यंत अद्ययावत आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानयुक्त प्लांटची निर्मिती केली जाणार होती, असं कंपनीच्या भारतीय अधिकाऱ्याने सांगितलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray government cancels 'three' agreements with china company