ये दिल मॉंगे मोर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

बेस्टच्या तिकीट दरात विक्रमी कपात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी समिश्र प्रतिसाद मिळाला.काही ठिकाणी प्रवाशी रिक्षा चुकवून बसच्या रांगेत उभे राहीले.तर,काही ठिकाणी प्रवाशांची "ये दिल मॉंगे मोर' अशी परिस्थिती आहे.

मुंबई  - बेस्टच्या तिकीट दरात विक्रमी कपात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी समिश्र प्रतिसाद मिळाला.काही ठिकाणी प्रवाशी रिक्षा चुकवून बसच्या रांगेत उभे राहीले.तर,काही ठिकाणी प्रवाशांची "ये दिल मॉंगे मोर' अशी परिस्थिती आहे. तिकीट दर कमी केल्यानंतर बेस्टने वेळेचे गणित जुळवून आणावे, अशी अपेक्षा आता प्रवासी व्यक्त करत आहेत. 

रिक्षांवर 25 टक्के परिणाम 
- मालाड स्थानकापर्यंत 10 रुपये बेस्टचे भाडे होते ते आता पाच रुपये झाल्याने प्रवासी अगदी दुपारच्या वेळेतही बेस्ट बससाठी थांब्यावर उभे दिसले. एरवी प्रवासी बेस्ट बसची वाट बघण्यापेक्षा पर्यायी व्यवस्था किंवा साधन म्हणून शेअर रिक्षा व टॅक्‍सीने 20 रुपये देउन वेळ वाचवण्यासाठी रिक्षाने प्रवास करायचे. परंतु, आता बेस्टने दर कमी केल्याने प्रवासी बेस्ट बसची वाट पाहत थांब्यावर उभे असलेले दिसले. तर रिक्षांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या दिसल्या. त्यामुळे बेस्टच हे पाऊल काहींना दिलासा देणारा जरी असले तरी गर्दीच्या वेळेत मात्र नाइलाजाने प्रवासी रिक्षा व टॅक्‍स चा पर्याय अवलंबून प्रवास करत होते. 

चाकरमान्यांना सकाळी कामावर जाण्याची घाई असल्याने वेळेत कामावर पोहोचण्यासाठी शेअर रिक्षा व टॅक्‍सी उपयोगी पडते, असे भूषण अवघडे या प्रवाशाने सांगितले. प्रवासी आज बेस्टसाठी रांग लावून उभे दिसले. मात्र काही वेळाने ते आमच्या रिक्षामध्ये आले. तरीही जवळ जवळ 25 टक्के प्रवासीसंख्येत घट जाणवली, असे अफजल शेख या रिक्षाचालकाने सांगितले. 

मिनी बस सुरू करा 
घाटकोपर ः घाटकोपर पश्‍चिमेकडील आर सीटी मॉल, अमृतनगर, भटवाडी असल्फा अशा वाहतूक कोंडीच्या परिसरातून रेल्वे स्थानाकवर येण्यासाठी प्रवाशांनी आजही शेअर रिक्षाचा वापर केला.बसचे भाडे पाच रुपये असले तरी वेळेच गणित जुळत नसल्याने शेअर रिक्षाचा महागडा पर्याय स्वीकारण्यावर प्रवाशांचा वर्दळीच्या वेळी भर होता. बस स्थानकावर 10 ते 15 मिनिटाच्या अंतरानंतर दुसरी बस येत असल्याने प्रवाशांचा वेळ जात असल्याचे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले . बेस्टच्या निर्णयाचं स्वागत प्रवाशांकडून होत असलं तरी प्रत्येक स्थानकात बेस्टने मिनी शेअर बसेस सुरु कराव्यात अशीही मागणी आता पुढे येत आहे . त्यामुळे बेस्ट प्रशासन प्रवाशांसाठी जादा बसेस रस्त्यावर उतरवणार का हे पाहावं लागेल. चिंचोळ्या गल्ल्या, वाहतूक कोंडी यावर वेगाने प्रवास करता यावा म्हणून बेस्टचे आता मिनी बसेस घ्यावा असा पर्याही काही प्रवाशांनी सुचवला. 

चारकोप- नव्या तिकीट दरामुळे प्रवाशांचे रोजचे किमान 15 ते 20 रुपये वाचणार आहे.मात्र,घाईच्या वेळी बसची वाट बघत शक्‍य नाही.तसेच,बस वाहतुक कोंडीत अडकण्याची शक्‍यता असल्याने तेथेही वेळ वाया जातो.त्यामुळे शेअर रिक्षा शिवाय पर्याय नसतो.असे प्रवाशी सांगतात.जेथे शेअर रिक्षा जात नाही तेथे तीन प्रवासी मिळून भाड्याची रक्कम वाटून घेतात.रिक्षा टॅक्‍सीला पैसे जास्त जातात.पण,मुंबईत वेळ महत्वाची आहे.बेस्टने तिकीट दर कमी केले आहेत.तर,आता बसेसची संख्याही वाढवावी असे चारकोप मधील प्रवाशी सांगतात.मी दररोज कांदिवली स्थानक ते चारकोप असा प्रवास करत असून दरकपातीचे स्वागत आहे मात्र बस वेळेवर येत नसल्याने जास्त पैसे देऊन टॅक्‍सी अथवा रिक्षाने जाण्याशिवाय पर्याय नसतो.असे गायत्री देठे यांनी सांगितले. बेस्टने दर कमी केल्याने मला कांदिवली स्थानक ते चारकोप हे अंतराचे भाडे फक्त 5 रुपये असणार आहे ही खूप आनंदाची बाब आहे .असे अक्षता देवरुखकर नमुद करतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first day Best Bus Response