पोलिओ लसीकरणातून मुंबईतील हेल्थ केअर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

भाग्यश्री भुवड
Thursday, 14 January 2021

पहिल्या टप्प्यात हेल्थकेअर कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार असून मुंबईतील 1 लाख 25 हजार हेल्थ केअर कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

मुंबई: देशभरात येत्या 16 जानेवारीला कोविड लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थकेअर कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार असून मुंबईतील 1 लाख 25 हजार हेल्थ केअर कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. मात्र, या कालावधी दरम्यान येणाऱ्या पोलिओ लस मोहिमेला केंद्राकडूनच पुढे ढकलण्यात आले. ज्यामुळे, मुंबईतील हेल्थकेअर कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी, 17 जानेवारीपासून पोलिओ मोहिम सुरू होते. मात्र यावर्षी ती पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, या वर्षी 16 तारखेपासून कोरोना लसीकरण सुरू होईल. ज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश प्राधान्याने आणि पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. पण, एकाच वेळी दोन लसीकरण मोहिम हाताळण्याची चिंता वाटत असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. कारण सध्याची पोलिओ लसीकरण मोहीम लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केली जाते. हे लसीकरण जरी चुकले तरी भविष्यात पोलिओ होण्याची शक्यता फारच कमी आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पोलिओ लसीकरण लांबल्यामुळे मुंबईतील हेल्थ केअर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. कारण, याच कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यातील कोविड लसीकरण केले जाणार आहे. पोलिओ लसीकरण पुढे ढकलले असल्याचे परिपत्रक मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

राज्यभरात राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत मुंबईत ही पल्स पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम घेतला गेला. 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर हेल्थकेअर वर्कर्सचे लसीकरण होईल. 17 तारखेला पल्स पोलिओचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. पण, तो पुढे ढकलण्यात आला आहे. लॉकडाऊन झाल्यामुळे बरीच कुटुंबे परदेशी गेले होते. स्थलांतरीत झाले होते. घर बंद होती. 0 ते 5 वयोगटातील लहान मुलांना पोलिओ लसीकरण दिले जाते. मात्र, ते कोविड लसीकरणामुळे पुढे ढकलण्यात आले आहे.
डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका आरोग्य विभाग

पालिका लसीकरण कार्यक्रमाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रत्येक जण 16 जानेवारीपासून कोविडसाठी सुरू होणाऱ्या सामूहिक लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य कर्मचारी 100 टक्के लक्ष देऊ शकत नाहीत. गैरसोय होण्यापेक्षा मोहिम पुढे ढकलणे कधीही चांगलेय.

हेही वाचा- मंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत धनंजय मुंडे यांनी केला मोठा खुलासा

''एकाच वेळी दोन लसीकरण चालवण्यामुळे समस्या उद्भवणार नाहीत मात्र, हेल्थ केअर वर्कसवर लसीकरणाचा ताण निर्माण होईल ज्याचा परिणाम घरोघरी जाऊन देणाऱ्या लसीकरण कार्यक्रमावर होईल.'' शिवाय, पोलिओ लसीकरण मोहिमेस उशीर झाला तर लहान मुलांच्या आरोग्यावर तेवढा परिणाम होणार नाही, कारण या आता राबवणाऱ्या मोहिमेदरम्यान त्यांना देण्यात येणारा डोस अतिरिक्त आहे.

पोलिओचे पाच डोस सक्तीचे

सायन रुग्णालयातील बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. पारस कोठारी यांनी सांगितले की, पोलिओ लसीकरण पुढे ढकलल्यामुळे कोणतीही हानी होत नाही. कारण, सध्याच्या परिस्थितीत देशातील इतर आजार किंवा विषाणूंपेक्षा कोरोनायरस नियंत्रित करणे जास्त महत्वाचे आहे. जगभरात कोविड -19 मुळे तयार झालेल्या वातावरणावर अवलंबून इतर गोष्टींना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. “पोलिओ प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला पोलिओ लसी जास्त प्रमाणात मिळत आहेत. मात्र, सध्या कोविड 19 वर लक्ष देण्याची गरज आहे. दरवर्षी पोलिओचे पाच डोस सक्तीचे असतात आणि हे अतिरिक्त डोस प्रतिकारशक्ती आणखी वाढण्यासाठी दिले जातात.” 

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

First phase 1 lakh 25 thousand healthcare workers vaccinated Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First phase 1 lakh 25 thousand healthcare workers vaccinated Mumbai