मुंबई पालिकेच्या लसीकरणाचा पहिला टप्पा 14 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार?

भाग्यश्री भुवड
Thursday, 28 January 2021

मुंबई महानगरपालिकेने आता येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याआधी लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने आता येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याआधी लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेत बुधवारी सकाळी मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात 11 वे लसीकरण केंद्र सुरू करून लसीकरण मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील लसीकरणासाठी दोन लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची आणि जवळपास 30 लाख ज्येष्ठ नागरिकांनी केंद्राच्या को-विन अॅपवर नोंदणी केली आहे.

पहिल्या टप्प्यात पालिकेनं कोविन अॅपवर नोंदणी केलेल्या सुमारे 1.25 लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, लसीकरण मोहिमेच्या गेल्या सहा सत्रात 26 हजार 694 आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 18 हजार 169 कर्मचाऱ्यांना 11 केंद्रावर कोव्हिशिल्डचे लसीकरण झाले आहे.

“सध्या 90 लसीकरणाचे बूथ आहेत. जिथे 68 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला डोस देण्यात आला. मात्र आता पहिला टप्पा लवकरात लवकर संपवायचा आहे जेणेकरुन    दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात तेच मनुष्यबळ वापरू शकतील. यासाठी एकदा हिरवा कंदील आणि पुरेसे डोस उपलब्ध झाले की तेही काम सुरू होईल. ” असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बुधवारी, ठरलेल्या 7,700 आरोग्य सेवा कर्मचार्‍यांपैकी तब्बल 5,179 जणांना मुंबईतील 11 केंद्रांवर कोविड -19 लसीचा डोस देण्यात आला, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लसीकरणासाठी निवडलेल्या 7,700  आरोग्य सेवकांपैकी केवळ  68 टक्के (5,179) आरोग्य कर्मचाऱ्यांना रोगप्रतिबंधक लस टोचण्यात आली होती. यासह आतापर्यंत मुंबईत कोरोनव्हायरसवरील देण्यात येणाऱ्या लसीकरणात आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांची संख्या वाढून 23,399 झाली आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पालिका पोलिस, राज्य आणि केंद्रीय पोलिस विभाग, सशस्त्र सेना, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांसह आघाडीच्या सर्व कामगारांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम राबवेल.

दरम्यान, पालिका लसीकरण केंद्रे वाढवत आहे जेणेकरुन दिलेल्या कालावधीत जास्त हेल्थकेअर वर्कर्सला लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण होईल.  ज्यामुळे त्यांनी 11 केंद्रांवरील युनिट्सची संख्या 65 वरून 90 पर्यंत वाढवली आहे.

हेही वाचा- 'या' दिवसांपासून सुरु होणार एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेची नोंदणी

“आम्ही हेल्थकेअर वर्कर्सना पुन्हा संधी देऊ ज्यांनी पहिल्या टप्प्यात लसीकरण करुन घेतले नाही. जर ते पुढे आले नाहीत, तर आम्ही कोणतीही प्रतीक्षा न करता दुसर्‍या टप्प्याला सुरूवात करु, ही एक ऐच्छिक प्रक्रिया असल्याने आम्ही जबरदस्ती करु शकत नाही, ”असे ही पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, अद्याप कोणतेही गंभीर दुष्परिणाम नोंदवलेले नाहीत.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

first phase Mumbai bombay Municipal Corporation vaccination expected completed February 14


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first phase Mumbai bombay Municipal Corporation vaccination expected completed February 14