कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पहिलं पोस्ट कोविड सेंटर ठाण्यात

राजेश मोरे
Thursday, 15 October 2020

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून हे पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले असून एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महापौर नरेश गणपत म्हस्के आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली या पोस्ट कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली.

मुंबईः  कोरोनामुक्त झाल्यानंतरही उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर कशी मात करायची तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतरही आपण काय काळजी घ्यायला हवी यासाठी ठाणे महानगरपालिकेने राज्यातील पहिले अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर उभारले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महापौर नरेश गणपत म्हस्के आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली या पोस्ट कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.

कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पहिलं अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर ठाणे महापालिकेच्यावतीने उभारण्यात आले आहे. लोढा लक्झोरिया कॉम्प्लेक्स, माजिवडा येथील महापालिकेच्या अधिनस्त असलेल्या इमातीच्या पहिल्या मजल्यावर हे अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोनामुक्त झाल्यानंतरही रूग्णांना जाणवणाऱ्या अनेक लक्षणांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कोरोनामुक्त रूग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच कोरोनाच्या काळातील कटू अनुभवातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ञ, आहारतज्ज्ञ, योगतज्ञ, समुपदेशक, फिजिओथेअरपिस्ट यांच्यासह या सेंटरमध्ये योगा सेंटर, विश्रांती कक्ष तसेच समुपदेशन सेंटर अशा सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अनेक वाचाः  BKC कोविड केंद्रात 270 कोरोनाग्रस्त रुग्णांचे डायलिसिस करुन वाचवले प्राण

मानसोपचार तज्ज्ञाचे सुयोग्य मार्गदर्शन

कोरोनाच्या काळातील अनुभवांमुळे मानसिकदृष्ट्या रुग्ण खचून गेलेल्या रूग्णांना मानसिक आधार देण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी या सेंटरमध्ये मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनानंतर जाणवणारा थकवा, बैचेनी, अनाहूत अस्वस्थता, लक्ष केंद्रीत न होणे, लवकर काही न आठवणे अशा अनेक कारणांनी रुग्ण त्रस्त झालेले असतात. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला असतो. त्यामुळेच कोरोनानंतर आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी या पोस्ट कोविड सेंटरमध्ये समुपदेशन केंद्र उभारण्यात आले असून मानसोपचार तज्ज्ञाच्या सुयोग्य मार्गदर्शनाने रूग्णांना मानसिकदृष्ट्या सक्षम केले जाणार आहे.

वैद्यकीय कक्ष

कोरोनानंतर जाणवणारी लक्षणे म्हणजे कमी उत्साह आणि थकवा श्वाच्छोश्वास घेण्यास त्रास, छाती भरून येणे, सतत येणारा खोकला, कफ पडणे, तोंडाला चव न येणे, अपचन, डोकेदुखी, बैचैनी वाढणे झोप न लागणे परत कोरोना होईल याची भीती वाटणे या सर्व गोष्टीचा सामना करण्यासाठी या सेंटरमध्ये वैद्यकीय कक्ष उभारण्यात आला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत या सर्व गोष्टींवर उपचार केले जाणार आहे.

आहारतज्ज्ञ

कोरोनामुळे आपल्या दैनंदिन आहारात मोठा बदल झालेला असतो. शरीरामध्ये प्रचंड थकवा जाणवत असतो अशावेळी शरीरात ऊर्जा कशी वाढवावी, यासाठी समतोल आणि सकस आहार कोणता घ्यावा, कसा घ्यावा याचे मार्गदर्शन करण्यासाठी या सेंटरमध्ये आहारतज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे.आहार तज्ज्ञामार्फत रुग्णांना दैनंदिन आहाराबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

योगा सेंटर

कोरोनाकाळात रुग्णांच्या शारीरिक आरोग्यावर देखील मोठा परिणाम झालेला आढळतो. त्यामुळे रुग्णांनी योग्य व्यायाम करून शारीरिक आरोग्य योग्य राखले पाहिजे यासाठी कोणता व्यायाम केला पाहिजे, श्वसनाचे व्यायाम, मध्यम व्यायाम आदी बाबत रुग्णांना योगा सेंटर मध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

फिजिओथेरपी कक्ष

कोरोनानंतर रूग्णांचे अवयव आणि स्नायू कमकुवत बनलेले असतात. त्यांना मजबुत करण्यासाठी कोणते व्यायाम करण्याची आवश्यकता आहे याचे मार्गदर्शन करण्यासाठी या सेंटरमध्ये फिजिओथेअरपिस्टची नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष बस सेवा या पोस्ट कोविड सेंटरमध्ये ये जा करण्यासाठी ठाणे स्टेशन येथून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी  6.30. पासून रात्री 12 पर्यंत दर अर्धा तासांनी या सेंटरसाठी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

--------------------------

 (संपादनः पूजा विचारे)

First post Covid Center in maharashtra corona virus free patients Thane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First post Covid Center in maharashtra corona virus free patients Thane