BKC कोविड केंद्रात 270 कोरोनाग्रस्त रुग्णांचे डायलिसिस करुन वाचवले प्राण

भाग्यश्री भुवड
Thursday, 15 October 2020

बीकेसी कोविड केंद्रातील डॉक्टरांनी कोरोनाबाधित आणि किडनीची समस्या असणाऱ्या आतापर्यंत तब्बल 270 रुग्णांचे यशस्वीरित्या डायलिसिस केले आहे. 21 ऑगस्टपासून ही डायलिसीसची सुविधा बीकेसी कोविड केंद्रात सुरू करण्यात आली आहे.

मुंबई: वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसी येथे सुरू केलेल्या जंम्बो कोविड केंद्रातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. किडनीचे कार्य नीट न चालणाऱ्या रुग्णांना वारंवार डायलिसिसची गरज भासते. अशातच सर्व रुग्णालये कोविड 19 च्या रुग्णांनी भरलेली असताना डायलिसिसची गरज असणाऱ्या रुग्णांनी कुठे जावं? हा देखील प्रश्न आहे. मात्र, या सर्व परिस्थितीत कोरोनाग्रस्त किडनीच्या डायलिसीसची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी पालिकेची कोविड केंद्रे ही उपयुक्त ठरताहेत.
 
बीकेसी कोविड केंद्रातील डॉक्टरांनी कोरोनाबाधित आणि किडनीची समस्या असणाऱ्या आतापर्यंत तब्बल 270 रुग्णांचे यशस्वीरित्या डायलिसिस केले आहे. 21 ऑगस्टपासून ही डायलिसीसची सुविधा बीकेसी कोविड केंद्रात सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, गेल्या एका महिन्यात 270 कोरोना ग्रस्त रुग्णांना आतापर्यंत या डायलिसीसचा फायदा घेता आला आहे. 

अधिक वाचाः  एकच... पण सॉलिड मारला, भाजपला सामनातून ठाकरी दणका

21 ऑगस्टपासून आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचे यशस्वीपणे डायलिसिस करण्यास या कोविड केंद्राला यश आले आहे. कोविड रुग्णांचा संसर्ग आणखी तीव्र होऊ नये आणि त्यांची प्रकृती ढासळू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी

डायलिसिस यूनिट अर्थात एकेडी म्हणजेच आर्टिफिशीयल किडनी डिविझनची आयसीयूप्रमाणे काळजी घेतली जाते. जे डॉक्टर्स या यूनिटमध्ये जातात त्यांना पीपीई किट्स आणि सर्व सुरक्षात्मक सुविधा देऊनच आत सोडले जाते. रुग्णांच्या बेडसमध्ये ही अंतर ठेवले जाते. डायलिसिससाठी वापरण्यात येणारी सर्व यंत्रसामुग्री आणि सामानावर ( बायोमेडीकल वेस्ट) कोविडचा जंतू राहण्याची शक्यता असते. त्यामुळे, तिथली प्राधान्याने स्वच्छता केली जाते. सध्या या कोविड केंद्रात 2 डायलिसीस युनिट असून 12 खाटा यासाठी देण्यात आल्या आहेत. त्यातील सद्यस्थितीत 3 बेड्सवर रुग्ण आहेत. बाकी 9 बेड्सरिक्त असून दररोज किमान 7 ते 8 जणांचे डायलिसीस इथे केले जाते. प्रत्येक रुग्णाच्या डायलिसीससाठी किमान तीन ते चार तास लागतात. त्यानंतर मशीनचे निर्जंतुकीकरण केले जाते त्यासाठी किमान अर्धा तास लागतो. 

अधिक वाचाः  मुंबईत मास्क न घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरु, गोवंडीत गुन्हा दाखल

केंद्रात डायलिसीसची सुविधा नसल्याकारणाने कोरोनाग्रस्तांना इतर ठिकाणी पाठवावं लागत होतं. पण, आता त्याची गरज पडणार नाही. दरदिवशी किमान 7 ते 8 जणांचे डायलिसीस केले जाते. अत्यंत काळजीने आणि खबरदारी घेऊन रुग्णांचे डायलिसीस केले जाते.
डॉ. राजेश ढेरे, कोविड केंद्र संचालक, बीकेसी

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Life saved by dialysis of 270 corona patients at BKC Covid 19 Center


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life saved by dialysis of 270 corona patients at BKC Covid 19 Center