उल्हासनगरच्या इतिहासात प्रथमच सिंधी विद्यार्थी आयएएस अधिकारी

दिनेश गोगी
रविवार, 29 एप्रिल 2018

एखादा विद्यार्थी यूपीएससीच्या परिक्षेला सर करण्याची आणि आयएएस अधिकारी होण्याची ही उल्हासनगरच्या इतिहासातील पहिलीच अभिमानास्पद बाब ठरल्याने या विद्यार्थ्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा-कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

उल्हासनगर - सुशिक्षित आणि सरकारी सेवेतील आईवडलांनी दिलेल्या संस्काराचे चीज करून दाखवणाऱ्या उल्हासनगरातील सिंधी भाषिक विद्यार्थ्याने यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण केली आहे. एखादा विद्यार्थी यूपीएससीच्या परिक्षेला सर करण्याची आणि आयएएस अधिकारी होण्याची ही उल्हासनगरच्या इतिहासातील पहिलीच अभिमानास्पद बाब ठरल्याने या विद्यार्थ्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा-कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

आशिष मदनलाल रावलानी असे या उल्हासनगरकरांसाठी भूषण ठरणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आशिषची आई सेवानिवृत्त शिक्षिका असून सेवनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणारे त्याचे वडील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी आहेत. विशेष म्हणजे रावलानी दाम्पत्याचा आशिष एकुलता एक मुलगा आहे.

गोलमैदान या उच्चभ्रू वसाहतीतील निरंकारी बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या आशिषने न्यूइरा शाळेत इयत्ता 7 वी पर्यंत शिक्षण घेतले.पुढे 10 वि पर्यंत कल्याण मधील लुड्स कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण घेतल्यावर 12 वि चांदीबाई कॉलेज मध्ये पूर्ण केली.त्यानंतर मुंबई मधील व्हीजेटीआय येथे सिव्हिल इंजिनिअरिंग पास केली.आशिषला जॉबची ऑफर येऊ लागली असतानाच आशिषने यूपीएससी परिक्षा देण्याचा निर्णय त्याच्या पालकांकडे बोलवून दाखवला. ही परिक्षा कठीण असली तरी पालकांनी आशिषचा हुरुप वाढवला आणि आशिषने यूपीएससीची तयारी केली.

'तिसऱ्या टर्म मध्ये किल्ला सर'
आशिषने 2015 मध्ये यूपीएससीची पहिली परीक्षा दिली. मात्र त्याच्या पदरी निराशा आली. त्याने पुन्हा 2016 मध्ये प्रयत्न केला. पण पुन्हा तो फार गुणांनी फेल झाला. इथे त्याच्यात आणखीन जिद्द तयार झाली आणि पुन्हा एकदा आशिषने 2017 मध्ये परिक्षा दिली. काल शनिवारी यूपीएससीच्या परिक्षेचा निकाल जाहिर झाला आणि त्यात भारतात 415 वा रँक मिळवणाऱ्या आशिष रावलानी याने तिसऱ्या टर्म मध्ये यूपीएससीचा किल्ला सर केला. या यशाबाबत दिल्लीत असणाऱ्या आशिषशी संपर्क साधला असता सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयातून यूपीएससी परिक्षा पास केली आहे. अजून कुठे सर्व्हिस मिळणार असे जाहीर झालेले नाही. पण विषयानुसार रेव्हेन्यू विभाग मिळण्याची शक्यता आशिष रावलानी याने 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: For the first time in the history of Ulhasnagar Sindhi student become IAS officer