बाजारात मासळीचे भाव तिप्पट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पापलेट, सुरमई, बोंबील, रावस, कुपा, कोळंबी नावं ऐकली की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. मात्र अवेळी पावसाळा व किनाऱ्यावर धडकणाऱ्या चक्रीवादळाने समुद्रातील खवय्यांच्या ताटातून मासे नाहीसे होण्याच्या मार्गावर आले आहेत. सोन्याप्रमाणे समुद्रातील मासळीही यंदा भाव खाऊ लागली आहे.

तुर्भे : पापलेट, सुरमई, बोंबील, रावस, कुपा, कोळंबी नावं ऐकली की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. मात्र अवेळी पावसाळा व किनाऱ्यावर धडकणाऱ्या चक्रीवादळाने समुद्रातील खवय्यांच्या ताटातून मासे नाहीसे होण्याच्या मार्गावर आले आहेत. सोन्याप्रमाणे समुद्रातील मासळीही यंदा भाव खाऊ लागली आहे. नवी मुंबईतील बाजारात मासळीचे भाव दुप्पट-तिप्पट वाढल्याने खवय्यांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

शहरातील मासळी विक्रेत्यांवर दुहेरी संकट आल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसारखी अवस्था झाली आहे. रोजच्या जेवणातील पापलेट, कोळंबी, रावस, सुरमई, हलवा, बोंबील, बांगडे यांचे भाव तर दुपटीने वाढले असून त्यात चिंबोऱ्या तर जेवणाच्या ताटातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. शहरातील दिवाळे, शिरवणे, जुहूगाव, कोपरखैरणे व घणसोली या ठिकाणी भरणाऱ्या मासळी बाजारातील खवय्यांच्या आवडीची मासळी गेल्या पंधरा दिवसांपासून कमी होत चालली असून भावही झपाट्याने वधारले आहेत. नवी मुंबईतील ताज्या मासळीची बाजारपेठ म्हणून दिवाळे गाव ओळखले जाते. मात्र येथील मच्छीमारी गेल्या दोन वर्षांपासून संकटात आली असताना आता चक्रीवादळ येणार असल्याने खोल समुद्रात मासेमारी करण्यास सागरी पोलिसांनी मज्जाव केल्याने मासळीचे प्रमाण कमी झाल्याने दर मात्र सोन्याच्या तोळ्याप्रमाणे वधारले आहेत. 

चिंबोरी नाहीशी होण्याच्या मार्गावर 
जी मासळी वाट्यावर विकली जायची तीच मासळी आता नगावर विकली जात आहे. पाचशे रुपयांच्या पापलेटच्या जोडीसाठी आता चक्क बाराशे ते दीड हजार मोजावे लागतात. पाचशे रुपये टोपलीने विकली जाणारी कोळंबी आता अडीचशे रुपये वाटा विकली जाऊ लागला आहे. सर्वसामान्यांची आवडीची मासळी म्हणून ओळखली जाणारे बोंबील, ढोमी, बोईस, मादेली, बांगडे आता दोनशे ते अडीचशे रुपये दोन नग याप्रमाणे बाजारात विकले जात आहेत. विशेष म्हणजे खाडीतील चिंबोरी नाहीशी होत असल्याची खंत डोलकरी बांधवांकडून व्यक्त होऊ लागली आहे. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला सुरुवात होते. त्यानंतर मासळीचे भाव उतरले जातात. यंदा मात्र पावसामुळे व चक्री वादळाने समुद्रातील मासेमारीला संकटाचा सामना करावा लागत असल्याने 6 ते 8 नोव्हेंबरपर्यंत समुद्रातील हवेचा वेग जास्त असल्याने मासेमारीला बंदी आणली असल्याने त्याचा फटका मासेमारीवर झाला आहे. त्यामुळे स्वतः व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार बांधवांसह भाऊच्या धक्‍यावरून मासळी आणणाऱ्या कोळी बांधवांवर दुहेरी आर्थिक संकट घोंगावत राहिले आहे. 

मासळीचे दर 
पापलेट 500 रुपये जोडी- आता 1200ते 1500 
रावस 700 रु. जोडी- आता 1000 ते 1200 
सुरमई- 500 ते 700 रु. जोडी- आता 1200/1500 
कोळंबी- 500 रु. टोपली- आता 1000 ते 1500 
बोंबील- 50 ते 100 रुपये वाटा- आता 100 ते 200रुपयांना दोन बोंबील 
बांगडे- 100 ला चार- आता 200 ते 300 ला दोन 
मांदेली- 50 रु. वाटा- आता 150 ते 250 वाटा 
बोईस- 100 रु. वाटा- आता 200 ला दोन 

मासळीचे प्रमाण कमी झाले असून त्यात वादळाने बोटी समुद्रात जाऊ न दिल्याने मासळीचे भाव तिप्पट वाढले आहेत. चिंबोरी तर नाहीशी झाली आहे. पावसामुळे मासेमारी संकटात आली असल्याने अनेकांना घर कसे चालवायचे, असा प्रश्न पडला आहे 
- भूषण कोळी, कोळी बांधव 

भाऊच्या धक्‍क्‍यावरही मासळी महागली असल्यामुळे नवी मुंबईच्या बाजारात आम्हाल चढ्या दरात मासळी विकावी लागत आहे. पहिल्यांदा असे मासळीचे संकट आल्याने आम्ही हवालदिल झालो आहोत. 
- रेशमा भोईर, मासळीविक्रेती  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fish prices triple in the market